कौंडण्यपूर-पंढरपूर बस सेवा सुरू करण्याची मागणी:अधिक मासामुळे भाविकांना थेट प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी
![]()
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर येथून थेट पंढरपूरसाठी एस.टी. बस सेवा सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पुरातन तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनानंतर भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी ही सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येत्या १७ मे ते १७ जून या कालावधीत अधिक मास येत आहे. या काळात पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या भाविकांना प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आर्वी आगाराने पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. केवळ अधिक मासातच नव्हे, तर नियमितपणे कौंडण्यपूर ते पंढरपूर बस सेवा सुरू करण्याची गरज वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दर महिन्यातून दोन वेळा येणाऱ्या एकादशीमुळे अनेक वारकरी आणि भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जातात. ही बस सेवा कायमस्वरूपी सुरू झाल्यास या भागातील आणि परिसरातील सर्व भाविक, वारकरी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
