लोकस्वातंत्र्य महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सन्मान:महापुरूषांना सामुहिक श्रद्धांजली केली अर्पण
![]()
प्रतिनिधी | अकोला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मासिक विचारमंथन मेळावा व महिला सन्मान समारंभ महसूल कॉलनीतील रोकडे सभागृहात संपन्न झाला. माझ्यासोबत एवढ्या मोठ्या महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला. हा सन्मान ही मला मिळालेली माहेरची साडी समजते, असे मनोगत लोकसाहित्याच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी भाषा संशोधन व मान्यता समिती सदस्या प्रा. डॉ. ममता इंगोले उपस्थित होत्या. गिरधारीलाल सारडा, महावितरण कंपनीच्या सब ऑर्डिनन्स इंजिनिअर्स असोसिएशनचे प्रदेश सरचिटणी संतोष खुमकर, स्त्री रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी आप्पासाहेब डांबरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन करण्यात आले. शहिद जवान, दिवंगत पत्रकार, महिला, शेतकरी, अपघात व आपत्तीग्रस्त दुर्दैवी बळींना सामुहिक श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठांमध्ये साहित्य समाविष्ट होण्याचा बहुमानप्राप्त मिळालेल्या काही साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे, पुष्पराज गावंडे, सचिव राजेंद्र देशमुख, अंबादास तल्हार, जया भारती, संदिप देशमुख, शंकरराव सांगळे, डॉ. विनय दांदळे, विजय देशमुख आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन राष्ट्रीय पदाधिकारी तथा महिला सन्मान संयोजिका जया भारती यांनी केले. आभार सचिव राजेंद्र देशमुख यांनी मानले.
