विज्ञान चळवळ होण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक -अनिल काकोडकर:कुंभारी येथे विज्ञान, इनोव्हेशन केंद्राचे भूमिपूजन; नवीन संकल्पनांवर चर्चा व्हावी
![]()
प्रतिनिधी | अकोला प्रत्येक कामाचे ज्ञान असणे व ते का हवे याचे भान व त्या कामासाठी समर्पण असणे गरजेचे आहे. ज्ञान, जाण व पॅशन या त्रिसूत्राने कोणत्याही बाबीचा विकास साधला जातो. याच अनुषंगाने हे विज्ञान व इनोव्हेशन केंद्र नवे प्रकल्प, नवाचार साकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, अणू वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. नवीन संकल्पना पुढे येऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याने बाजार सफल केला पाहिजे, मार्केटपुल निर्माण झाला पाहिजे, तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने इनोव्हेशन होऊ शकणार नसल्याचे काकोडकर यांनी स्पष्ट केले. ते अकोला एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कुंभारी येथील ज्युबिली इंग्लिश हायस्कूलमध्ये राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, मुंबई यांच्या मान्यतेने सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचा भूमिपूजन सोहळा सोहळ्यात बोलत होते. विदर्भातील दुसरे व राज्यातील सातवे केंद्र असणाऱ्या या केंद्राचा भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक राम भोगले, डॉ. अरुण सप्रे, खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, अकोला एज्युकेशन सोसायटीचे सचिव शार्दूल दिगंबर, प्राचार्य रमा सरप आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. राजेश्वर देशपांडे होते. उद्योगपती राम भोगले यांनी मनोगत व्यक्त करत आपले या शहराशी ऋणानुबंध असल्याचे सांगितले. शिक्षणाचा उपयोग हा खऱ्या दृष्टीने समाज जागृतीसाठी झाला पाहिजे आणि ही संस्था या माध्यमातून जागृती करत असून विज्ञान केंद्रामुळे नवी वैज्ञानिक पिढी निर्माण होणार असल्याचा मनोदय व्यक्त करत आर्थिक सहाय्य प्रदान केले. यावेळी आ. रणधीर सावरकर यांनीही मार्गदर्शन केले. जिल्ह्यात विज्ञानासाठी चांगले वातावरण जिल्ह्यात असल्याचे सांगितले. विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर इकोसिस्टीम ही जिल्ह्यात चांगली असून या नव्या नियोजित विज्ञान केंद्रामुळे जिल्ह्याची वैज्ञानिक व्याप्ती वाढवण्यास मदत होणार असून प्रोफेशनल क्षेत्रात जाणाऱ्या तरुणांची संख्या वैज्ञानिक क्षेत्रात वाढवले जाणार असल्याचेही ते म्हणाले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी योगिनी दिपके, श्रेया राठोड तथा मनीष नाईक यांनी तर आभार प्राचार्य रमा सरप यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी जितेंद्र पातूरकर, विनोद देव, माजी प्राचार्य विजय नानोटी, रा. स्व. संघाचे विभागीय संघचालक नंदकिशोर देशपांडे, शंतनू जोशी, डॉ. गजानन नारे, रामप्रकाश मिश्रा, डॉ. अभय पाटील, रमाकांत खेतान, किशोर देशपांडे, प्रा. किशोर बुटोले, दीपक मायी आदी उपस्थित होते. ….तोपर्यंत इनोव्हेशन अशक्य : काकोडकर पुढे म्हणाले ,कुठल्याही नवाचारात नाविन्य असते.ज्या कल्पना ज्यांच्या साठी विकसित झाल्या आहेत,त्यांना त्यापासून काही उपयोग झाला पाहिजे व त्यांनी त्या खऱ्या अर्थाने स्वीकारल्या पाहिजेत.तेच खऱ्या अर्थाने इंन्नोवेशन असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन संकल्पना पुढे येऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे. त्याने बाजार सफल केला पाहिजे. मार्केटपुल निर्माण होणे आवश्यक आहे. तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने इनोव्हेशन होऊ शकणार नसल्याचे काकोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. इन्होवेशन कार्य पुढे नेणारेही उत्सुक असले पाहिजे, तरच इन्होवेशनची इकोसिस्टीम पूर्ण होऊ शकेल, असे काकोडकर म्हणाले. नवीन संकल्पनांमध्ये लहान मुलांची रुची वाढवली गेले पाहिजे. त्यांच्यात इनोव्हेशन रुजवणे व या संदर्भातली जिज्ञासा निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. अपयशाने खचून न जाता नव्या आशा, आकांक्षा व नव्या कल्पनाने पुन्हा सामोरे जाऊन यावर सफलता प्राप्त केली पाहिजे. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांचे वैज्ञानिक उदाहरण सांगितले. क्रमिक पुस्तकातूनही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबी समोर आल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रे दृष्टिगोचर झाली पाहिजेत. विज्ञान ही चळवळ झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक संस्था, संघटना, विद्यार्थी, पालकांनी ही चळवळ उभारून संशोधन विज्ञान व इंनोवेशन या बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
