आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारलेत:दिव्यांग, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी धनुष्यबाण हाती घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
![]()
आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावे, हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्याची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कुठलीही तडजोड होणार नाही, असेही बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दिव्यांग मंत्रालय उभे राहिले असेल, तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या लढाईत एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना काय राहणार. मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल? त्यासाठी माझ्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावणारा आहे, तितकाच माझ्या मजूर, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी धावणार आहे. त्यांच्यासाठी कोणताही समझोता होऊ शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी निक्षूण सांगितले. आम्ही आमच्या राजकीय प्रवासाची शिवसेनेतून सुरुवात केली होती. माझ्या अजूनही बाळासाहेब ठाकरेंना शेतकरी कर्जमाफी संदर्भात लिहिलेले पत्र आहे. कापासाच्या भावासंदर्भात आम्ही राजीनामा दिला होता. आता पुन्हा शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे मुद्दे घेऊन आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहोत. हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी, मजूर, वंचित घटकांच्या, दिव्यांगांसाठी कसा कामी येईल? तो उचलण्याचा प्रयत्न करू, असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
