बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून संवाद:चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, कट्टर वैरी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
db-temp-cover-marathi-2026-04-28t162406393_1777373681.jpg




राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. अशातच राजकारणातील कट्टर वैरी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात नुकताच फोनवरून संवाद झाला आहे. या दोन नेत्यांमधील वाद सर्वश्रुत असताना, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये झालेली चर्चा नेमकी कशासाठी होती? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या फोन कॉलमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. विलीनीकरणासाठी बच्चू कडूंच्या अटी शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, बच्चू कडू यांना उमेदवारी देताना ‘प्रहार’ संघटना शिवसेनेत विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यावर बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे समजते. आधी विधान परिषदेची आमदारकी घ्यावी, त्यानंतर सहा महिन्यांनी मंत्रिपद मिळाल्यावरच पक्षाचे विलीनीकरण करावे. विलीनीकरण करायचे असल्यास शिवसेनेचे विदर्भ विभागाचे पूर्ण सूत्र ‘प्रहार’च्या हाती द्यावे, अशी मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, सध्या आमदारकी आणि सहा महिन्यांनी मंत्रिपद देण्याचे आश्वासन द्यावे अशीही मागणी मिळाल्याचे बोलले जात आहे. रवी राणांची मंत्रिपदाची जाहीर इच्छा दुसरीकडे, आमदार रवी राणा यांनीही एका सभेत बोलताना मंत्रिपदाची आपली प्रबळ इच्छा बोलून दाखवली आहे. “मी चार वेळा आमदार झालो असून १० आमदारांचे काम एकटाच करतो. जर मुख्यमंत्र्यांची कृपा झाली आणि मी मंत्री झालो, तर १० मंत्र्यांचे काम मी एकटा करून दाखवेन,” असा आत्मविश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. कडू आणि राणा या दोघांनीही मंत्रिपदावर डोळा ठेवल्याने अमरावतीच्या राजकारणातील ही स्पर्धा आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed