मंत्री लोढांच्या लेटरहेडवर सदनिकांचा काळाबाजार:संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र, 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

0
db-temp-cover-marathi-2026-04-28t170633626_1777376244.jpg




मुंबई आणि उपनगरातील प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिकांच्या वाटपात १०० कोटी रुपयांहून अधिकचा मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून या प्रकरणातील ‘रॅकेट’वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यासाठी मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या शासकीय लेटरहेडचा गैरवापर केला जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मुंबईत प्रकल्पग्रस्तांना घरे मिळवून देण्याच्या नावाखाली एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये ‘सकल हिंदू समाज’ ही संस्था दलालाची भूमिका बजावत असून, वीरेंद्र प्रताप उर्फ बबलू सिंह नावाचा व्यक्ती या उद्योगाचा सूत्रधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही संस्था बोगस सदनिकाधारकांची नावे आपल्या लेटरहेडवर देऊन, त्याला मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे शिफारसपत्र जोडते आणि त्याद्वारे म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. गोवंडीतील ‘समर्पण सोसायटी’चे दिले उदाहरण या घोटाळ्याची कार्यपद्धती स्पष्ट करताना संजय राऊत यांनी गोवंडी पूर्व येथील हनुमान मंदिर जवळील ‘समर्पण सोसायटी’चे उदाहरण दिले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, बबलू सिंह याने अस्तित्वात नसलेल्या ‘अजित धनाजी कदम’ या नावाने तक्रार अर्ज केला आणि या सोसायटीतील सदनिका क्र. १०२, १०३ आणि १०४ चे वाटप सुरेश नारायण गुप्ता, अनिल गुप्ता आणि शिला लालमन गुप्ता यांना करून दिले. या बदल्यात प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये उकळले असून, हा संपूर्ण व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. शंभर कोटींच्या वर घोटाळा? मुंबई आणि उपनगरात अशा पद्धतीने शेकडो सदनिकांचा गैरव्यवहार झाला असून, या घोटाळ्याची व्याप्ती १०० कोटी रुपयांच्या वर असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. बनावट ओळखपत्रे, बनावट सही-शिक्के आणि बनावट कागदपत्रे तयार करून मूळ प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी “मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या लेटरहेडचा वापर करून सुरू असलेला हा सदनिका घोटाळा अत्यंत गंभीर असून, गरीब मराठी माणसांची फसवणूक केली जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन या ‘रॅकेट’चा पर्दाफाश करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी विनंती संजय राऊत यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी शिफारसपत्र का दिली? – अंजली दमानिया दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. SRA, MMRDA, BMC, MHADA हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. प्रचंड प्रमाणात घोळ होतोय आणि ह्यात अशा ‘सकल हिंदू समाज’ व मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोंढा हे जर खतपाणी घालत असतील तर तत्काळ चौकशीची आदेश दिले पाहिजेत, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. मंगल प्रभात लोढा यांनी शिफारसपत्र का दिली? ह्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळालेच पाहिजे. सकल हिंदू समाजकडून अशी स्वतःच्या लेटरहेड आतापर्यंत अशी किती शिफारशीची पत्र दिली गेली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या सगळ्या लोकांनी किती किती पैसे दिले हे समोर आले पाहिजे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed