LPG Cylinder New Rules | 1 मे पासून गॅस सिलेंडरचे नवे नियम लागू; बुकिंगबाबत मोठे बदल
LPG Cylinder New Rules | एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सरकारने एलपीजी वितरण आणि बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नवीन नियम 1 मेपासून लागू होणार आहेत.
सिलेंडर बुकिंग आणि वितरणाच्या प्रक्रियेत मोठे बदल
नव्या नियमांनुसार, ग्राहकांना आता गॅस सिलेंडर घरी पोहोचल्यावर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला वन टाइम पासवर्ड (OTP) वितरकाला सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनुदानाचा लाभ खऱ्या लाभार्थ्यालाच मिळावा आणि काळाबाजार रोखला जावा या प्रमुख उद्देशाने ही सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, दोन सिलेंडर नोंदणी करण्यामधील वेळेचे अंतरही वाढवण्यात आले आहे. शहरातील ग्राहकांना आता २१ ऐवजी २५ दिवसांनंतरच नवीन गॅस नोंदवता येईल, तर ग्रामीण भागात हीच मुदत ४५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता इंधनाचा वापर अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) गॅस घेणाऱ्या लाभार्थ्यांना आधार (Aadhaar) आधारित ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे सक्तीचे केले आहे. ज्यांनी हे यापूर्वीच केले आहे त्यांना पुन्हा करण्याची आवश्यकता नसली तरी, इतर ग्राहकांना प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. इराण आणि इस्रायल (Iran-Israel) यांच्यातील प्रदीर्घ वादामुळे इंधन वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. आपला देश ६० टक्के गॅस परदेशातून आयात करत असल्याने, पुरवठ्यातील या जागतिक अडथळ्यांचा थेट फटका देशांतर्गत वितरणाला बसला आहे.
गॅसच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता
महागाईच्या या काळात ग्राहकांच्या खिशाला आणखी एक मोठी झळ बसण्याची चिन्हे आहेत. अलीकडच्या काळात घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतींमध्ये आधीच ६० रुपयांची भर पडली आहे. केवळ घरगुतीच नाही, तर व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसच्या दरांमध्येही गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीच्या तेल विपणन कंपन्या, जसे की इंडियन ऑइल (Indian Oil), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) सध्या त्यांच्या खर्चाचा आणि वितरणाचा सखोल आढावा घेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे आणि गॅसचे भाव वधारत असल्याने, येत्या १ मे पासून या कंपन्या गॅसच्या दरांमध्ये आणखी वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आगामी काळात इंधनासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
News Title: LPG Cylinder New Rules Applicable From May 1
