चंदननगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न:पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
![]()
पुण्यातील चंदननगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास चंदननगर भागातील एका सोसायटीत घडली. महात्मा फुले पोलीस चौकीतील कर्मचारी तलवारे आणि सतीश कतारी हे त्यावेळी गस्त घालत होते. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपले वडील आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच, तलवारे आणि कतारी यांनी तात्काळ संबंधित सोसायटी गाठली. त्यांनी ती सदनिका शोधून काढली, परंतु आतून दरवाजा बंद होता. कोणताही विलंब न करता, त्यांनी एका वेल्डिंग कारागिराशी संपर्क साधला. वेल्डिंग कारागिराने दरवाजा उघडल्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिले की ज्येष्ठ नागरिक गळफास घेण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी तात्काळ ज्येष्ठ नागरिकाला धीर देऊन खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर, त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या कामगिरीबद्दल पोलीस कर्मचारी तलवारे आणि कतारी यांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात आले. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कारही करण्यात आला. पोलिसांनी संवेदनशीलपणे केलेल्या याकामगिरीमुळे एक जीव वाचला शिवाय अशा घटनांना वेळीच रोखणे देखील आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.
