पुण्यात तीन ठिकाणी ९ लाखांची चोरी:बिबवेवाडी, कोंढवा आणि तुळशीबागेत घरफोडी व पाकीटमारीच्या घटना
![]()
पुणे शहरात चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरात घरफोडी करून पावणेतीन लाख रुपयांचे दागिने, रोकड आणि मोबाईल चोरण्यात आले, तर तुळशीबागेत एका महिलेच्या पर्समधून सहा लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी येथील रम्यनगरी हाऊसिंग सोसायटीमध्ये एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९१ हजार रुपयांचा मोबाईल आणि मनगटी घड्याळ चोरले. तक्रारदार तरुण सकाळी कामासाठी सोसायटीच्या आवारात गेला असताना चोरट्याने संधी साधून सदनिकेची कडी उघडून घरात प्रवेश केला. या घटनेची फिर्याद बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलीस हवालदार एन. जाधव पुढील तपास करत आहेत. कोंढवा परिसरातील शिवनेरीनगरमध्ये महम्मद सैफ टॉवरमधील एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्याचे बिस्कीट असा एकूण एक लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक एस. जाधव तपास करत आहेत. याशिवाय, तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून सहा लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळशीबागेत महिलेचे दागिने चोरी वाघोली येथील एका सोसायटीत राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांनी सराफी पेढीतून खरेदी केलेले दागिने एका छोट्या खोक्यात ठेवून ते पर्समध्ये ठेवले होते. तुळशीबागेतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून दागिन्यांचे खोके लंपास केले. घरी पोहोचल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. या तिन्ही घटनांमधील चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. बिबवेवाडी, कोंढवा आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांतील अधिकारी पुढील तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
