छत्रपती शिवरायांविषयी निरर्थक वाद सुरू:'शिवाजी कोण होता?' वर आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचले की नाही मला माहिती नाही – मुख्यमंत्री
![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवदेनशील कृत्य आहे, असे ते म्हणालेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर आज आंबी यांनी बुलढाण्यात शिवाजी कोण होता पुस्तकाचे वाचन करत संजय गायकवाड यांच्या घरावर डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसोबत मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त शब्दांत या घटनेविषयी आपला रोष व्यक्त केला आहे. संजय गायकवाड यांना हाणला टोला मुख्यमंत्री सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी निरर्थक वाद निर्माण झाला आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा कुणीही अवमान करू शकत नाही. त्यांचा मान एवढा मोठा आहे की, कुणीही त्यांचा अशा पद्धतीने अपमान करणे शक्य नाही. आता हे पुस्तक (शिवाजी कोण होता) 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवेदनशील कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने (संजय गायकवाड) हे पुस्तक वाचले की नाही हे मला माहिती नाही. तसे आंदोलन करणाऱ्या लोकांनाही आपण आंदोलन कशासाठी करत आहोत हे माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही. केवळ कोणतातरी एखादा मुद्दा पकडायचा आणि त्यावर वाद उभा करायचा व चर्चेत रहायाचे हा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील चाकू हल्ल्यावरही केले भाष्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबईत धर्म विचारून चाकू हल्ला करणाऱ्या एका तरुणाच्या घटनेवरही भाष्य केले. ते म्हणाले, सदर प्रकरण हे सेल्फ रॅडिकलायझेशरनचे (स्व-कट्टरतावाद) आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पुस्तके, साहित्य व इंटरनेटच्या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा प्रयत्न होत आहे. त्यातून हा आरोपी तयार झाला आहे. आरोपीने केवळ आपल्याला काहीतरी जिहाद करायचा आहे म्हणजे इतर धर्मियांना मारायचे आहे या विचाराने पेटून हे कार्य केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आता एटीएस व एनआयएच्या मदतीने या कट्टरतवादामागे कोण आहे याचा तपास केला जाईल. सदर तरुणाचे कुटुंब परदेशात अमेरिकेत राहते. हा तरुणही तिथे अनेक वर्षे राहिला आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर तो पहिल्यांदा कुर्ला व त्यानंतर नवानगराला राहायला आहे. त्याच्या संपर्कात इतर कुणी आहे का? किंवा अजून कुणी अशा कट्टरतावादाला बळी पडले आहे का? या सगळ्या गोष्टी तपासातून पुढे येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
