गृहनिर्माण संकुलांतील सांडपाणी, कचरा ऑडिट; दोषींवर कारवाई:प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची घोषणा, नियमांचे पालन आवश्यक

0
e8e3e83f-bf5b-417b-b637-087eb1c49635_1777295040260.jpg




राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांमधील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा (STP) आणि कचरा विलगीकरणाचे ऑडिट केले जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. सिद्धेश कदम हे ‘प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया’ आणि ‘भारत रिसायकलिंग शो’ यांच्या वतीने आयोजित ‘रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६’ परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषण नियंत्रणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांमधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे नियमितपणे चालवली जातात की नाही, तसेच कचरा विलगीकरण केले जाते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी राज्यस्तरीय ऑडिट केले जात आहे. राज्यातील मोठ्या शहरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत सांडपाणी प्रदूषण जलप्रदूषणास कारणीभूत ठरत आहे, तर कचरा विलगीकरण न केल्याने मातीचे प्रदूषणही वाढत आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या गृहनिर्माण संकुलांमध्ये अशी यंत्रणा कार्यान्वित आहे, परंतु तिचे पालन केले जात नसेल, तर त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रदूषण नियंत्रणासाठी मंडळाने हे आग्रही पाऊल उचलले असल्याचे कदम यांनी सांगितले. पुणे शहरातील आरएमसी (RMC) प्लांटचीही अशाच पद्धतीने तपासणी केली जाईल. आरएमसी प्लांट उद्योगांनी हवा प्रदूषण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी आणि मंडळाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी आरएमसी प्लांट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ दंडात्मक कारवाई करण्यावर भर देत नाही, तर राज्यातील औद्योगिक आस्थापना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठीही नेहमीच तत्पर असते, असेही सिद्धेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन २०२६’ अंतर्गत राज्यभरात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि रत्नागिरी येथे प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन परिषदा भरवण्यात येणार आहेत. वेस्ट रिसायकलिंगच्या माध्यमातून सर्क्युलर इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि यात नवउद्योजक तरुणांचा सहभाग वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed