मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळिमा!:शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिन्यांच्या बाळाचा करुण अंत, कारवाईची मागणी

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-27t191625540_1777297615.jpg




सरकारी असो किंवा खासगी, आजकाल रुग्णालयांमध्ये माणुसकी आणि संवेदना हरवत चालल्याचे विदारक चित्र वारंवार समोर येत आहे. अशाच एका संतापजनक घटनेत, मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चार महिन्यांच्या निष्पाप बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप त्याच्या आईने केला आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरुद्ध नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोग्य यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्या बाळाला न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबीयांनी आता कायदेशीर लढा पुकारला असून, 15 एप्रिल रोजी मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी केवळ पोलिसांकडेच नव्हे तर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि पोलिस आयुक्त यांच्याकडेही पत्रव्यवहार करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मातेचा आक्रोश मन हेलावून टाकणारा असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अंबरनाथ येथील पालेगावमधील रहिवासी अर्चना पाटील यांचा मुलगा शिवांश याला सर्दी-तापाचा त्रास जाणवत असल्याने सुरुवातीला कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बाळाच्या छातीत कफ असल्याचे सांगत वाडिया हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. मात्र, वाडिया रुग्णालय प्रशासनाने पहिल्या भेटीत बाळाला दाखल करून न घेता, केवळ औषधे देऊन आणि त्याला ‘टीबी’ असल्याचे निदान करून घरी पाठवले. 29 मार्च रोजी बाळाची प्रकृती पुन्हा बिघडल्याने पाटील कुटुंबाने त्याला तातडीने वाडिया रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत बाळ खेळत होते, मात्र तिथे दाखल होताच पुढील 24 तासांत बाळाची स्थिती बदलली. नळ्या टाकून दररोज बाळाच्या टाळूतून रक्त काढले बाळाच्या आईने केलेल्या खळबळजनक आरोपानुसार, मुख्य डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केवळ नर्स आणि शिकाऊ डॉक्टरांनीच शिवांशवर उपचार केले. पालकांच्या मते, कोणतीही पूर्वकल्पना न देता बाळाच्या डोक्याचे व पोटाचे ऑपरेशन करण्यात आले आणि त्याच्या शरीरात विविध ठिकाणी नळ्या टाकून दररोज टाळूतून रक्त काढले जात होते. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, ज्या व्हेंटिलेटरवर बाळाला ठेवले होते, त्यात दोन वेळा शॉर्ट सर्किट होऊन ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. केवळ शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि यंत्रणेच्या बिघाडामुळे आपल्या बाळाचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोप अर्चना पाटील यांनी केला आहे. अखेर बाळाचा मृत्यू झाला तब्बल 13 दिवस अर्चना पाटील यांचे बाळ आयसीयूत मृत्यूशी झुंज देत होते, मात्र या संपूर्ण काळात त्याने एकदाही डोळे उघडले नाहीत. 10 एप्रिल रोजी अखेर बाळाचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारापूर्वी बाळाचे शरीर स्वच्छ करण्यासाठी नेले असता, त्याच्या शरीरात घातलेल्या नळ्या अक्षरशः सडलेल्या अवस्थेत होत्या, असा काळीज पिळवटून टाकणारा आणि धक्कादायक आरोप पीडित मातेने केला आहे. इतकेच नाही तर, या कठीण प्रसंगी रुग्णालय प्रशासनाने सहानुभूती दाखवण्याऐवजी सुरक्षा रक्षकांमार्फत आपल्याला धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचेही त्यांनी सांगितले. कठोर कारवाई करण्याची मागणी या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे आता रुग्णालय प्रशासनाकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा अर्चना पाटील यांनी केला आहे. आपल्या निष्पाप बाळाला न्याय मिळावा यासाठी त्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सरकारकडे दाद मागत आहेत. या गंभीर आरोपांबाबत वाडिया रुग्णालय प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री या संवेदनशील प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed