हिंगोलीत हार्डवेअरचे दुकान फोडून चोरट्यांनी ५.२३ लाखांचा मुद्देमाल पळविला:हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल
![]()
हिंगोली शहरातील महेश चौक भागातील हार्डवेअरच्या दुकानावरील लाकडी दरवाजाचे पट काढून चोरट्यांनी ५.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २६ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील व्यापारी नितीन निलावार यांचे महेश चौक भागात हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानामध्ये बांधकाम व नळ फिटींगचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. नेहमी प्रमाणे नितीन हे दुकान बंद करून घरी गेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या वर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या लाकडी दरवाजाचे पट तोडले. त्यानंतर दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर दुकानातील पितळी वस्तू, ह्रँन्ड शॉवर, एफ. डी. शॉवर, मेट्रो फ्लश वॉल, वॉल मिक्सर, ब्रास टी, ब्रास एलबो, पट्टी वाॅल, स्टॉफ लॉक आदी पितळी वस्तू पळविल्या. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर नितीन यांनी दुकानातील साहित्याची पाहणी केली. त्यानंतर स्टॉकची मोजणी केल्यानंतर ५.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी व्यापारी नितीन निलावार यांनी रविवारी ता. २६ रात्री हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, मोहमद शेख, गणेश लेकुळे, जोगे, संतोष करे, शिवाजी ढेंबरे, गणेश वाबळे यांच्यासह पथकाने पाहणी केली आहे. पोलिसांनी परिसरातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जमादार मोहमद शेख पुढील तपास करीत आहेत.
