मनसे पक्षाच्या पैठण तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्याचा निर्धार
![]()
प्रतिनिधी | ढोरकीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पैठण तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली. पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे नेते व माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ही बैठक पार पडली. बैठकीत पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली. नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप चितलांगे, बिपिन नाईक व मनोज पा. मुरदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षप्रमुखांच्या विचारांचा प्रचार, प्रसार गावागावात आणि घराघरात पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच स्थानिक प्रश्नांवर मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही स्पष्ट करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे सैनिकांनी पुढाकार घ्यावा, असेही सांगण्यात आले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर या वेळी विशेष भर देण्यात आला. नवीन कार्यकर्ते जोडणे, शाखा विस्तार करणे तसेच स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संवाद वाढवण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन करण्यात आले. या विशेष बैठकीचे आयोजन मनोज पा. मुरदारे यांनी केले होते. बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक समस्यांवर आपली मते मांडत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. जिल्हा सचिव राहुल पाटील, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष मनीष जोगदंडे, पैठण शहराध्यक्ष नितीन पा. शेळके, जिल्हा सचिव भगवान पा. खाटीक, तालुका उपाध्यक्ष नवनाथ चौधरी, बिडकीन शहराध्यक्ष अक्षय लोणकर व उपशहराध्यक्ष राकेश ढालकरी उपस्थित होते.
