संजय गायकवाड यांच्याविरोधात अद्याप FIR नाही:सरकारशी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करायचा नाही हा नवा नियम आहे का? – पवार

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-24t15_1777023466.png




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मुद्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी गुरुवारी पुराव्यांसह संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पण सरकारने अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारशी संबंधित असलेल्यांवर एफआयआर दाखल करायचा नाही हा गृहखात्याचा नवा नियम आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यात आमदार गायकवाड हे आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना ऐकू येत आहेत. आंबी यांनी या प्रकरणी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली. पण पोलिसांनी अद्याप त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त टीका केली आहे. रोहित पवारांचा राज्याच्या गृहखात्याला सवाल रोहित पवार म्हणाले, प्रशांत आंबी यांनी काल पुराव्यासह रीतसर तक्रार देऊनही अद्यापही FIR दाखल झालेला नाही. आमदार असले सत्ताधारी असले, सरकारशी संबंधित असले म्हणजे FIR दाखल करायचा नाही हा गृहखात्याचा नवा नियम आहे का? आज सायंकाळी 4.30 वाजता कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस स्टेशनला FIR दाखल व्हावा यासाठी प्रशांत आंबी यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, पोलिसांनी तत्काळ FIR दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती! तत्पूर्वी, एका पोस्टद्वारे रोहित पवार यांनी सरकारशी संबंधित व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करणे किती कठीण आहे? हे मी स्वतः अजितदादांच्या अपघात प्रकरणात फार जवळून अनुभवल्याचा दावा केला होता. तसेच आज आपण स्वतः स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिस्थळी होणाऱ्या एका कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. आत्ता पाहू काय आहे नेमके प्रकरण? आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? असे म्हणत गायकवाड आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी दिली. तसेच, पानसरेंचे काय झाले? माहिती आहे ना? असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यांच्या या विधानाचे आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *