विदेशी नागरिकांची फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या माजी महापौरांना दिलासा:बनावट कॉल सेंटर प्रकरणात सात महिन्यांनंतर सुटकेचा मार्ग मोकळा
![]()
बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सात महिन्यांपासून नाशिक कारागृहात असलेल्या कोल्हेंना जामीन मंजूर करण्यात आला असून, ते लवकरच कारागृहाबाहेर येणार आहेत. या निर्णयामुळे कोल्हे कुटुंबीयांसाठी हा मोठा कायदेशीर दिलासा मानला जात आहे. या प्रकरणाची सुरुवात जळगाव शहराजवळील ममुराबाद रस्त्यावरील कोल्हे यांच्या फार्महाऊसवरून झाली होती. तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना येथे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार 28 सप्टेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात उपकरणे आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. छाप्यामध्ये 31 लॅपटॉप आणि कॉल सेंटर चालवण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक साधने आढळून आली. प्राथमिक चौकशीत हे कॉल सेंटर विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी चालवले जात असल्याचे उघड झाले. कर्मचारी स्वतःला अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवत विविध ऑफर्स, सेवा किंवा डेटा पडताळणीच्या नावाखाली पैसे उकळत होते. दोन लॅपटॉपमधून आर्थिक व्यवहारांचे ठोस पुरावेही पोलिसांना मिळाले होते. या प्रकरणात पोलिसांनी ललित कोल्हे यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, कोल्हे हे कारागृहात असतानाच जळगाव महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजयही मिळवला, मात्र जामीन न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता जामिनासाठी कोल्हे कुटुंबाने सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात प्रयत्न केले, पण त्यातून दिलासा मिळाला नाही. अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय देत जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे आता त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हे यांचे पुत्र आणि नगरसेवक पीयूष कोल्हे यांनी या निर्णयाची माहिती दिली. मात्र, न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोल्हेंच्या सुटकेनंतर जळगावच्या स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
