पुण्यात सहायक फौजदार, हवालदार निलंबित:अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याने पोलिस उपायुक्तांचे आदेश
![]()
पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी) कार्यरत होते. मार्च २०२६ मध्ये एका अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कर्तव्यावर असताना अवैध धंदे चालविणाऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध ठेवणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि सार्वजनिक ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण करणे हे गैरवर्तन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या गंभीर गैरवर्तणुकीमुळे आणि बेशिस्तीमुळे मुंबई पोलिस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ) (१) (ब) आणि मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील नियम २५ च्या तरतुदींनुसार उपायुक्त मोहिते यांनी दोघांनाही निलंबित केले आहे. पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या अवैध धंदेवाल्यांविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हद्दपारीची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाही, पोलिस कर्मचाऱ्यांकडूनच अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खुटवड आणि पवार यांनी कोणाच्या वरदहस्ताने ही वसुली केली आणि हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच, या पैशांचे वाटप तपास पथक प्रमुख, पोलिस निरीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांपर्यंत झाले होते का, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
