नियमांची फाइल सुट्टीवर, नियुक्ती मात्र एक्सप्रेस वेगाने! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेतील बदलीवर पोलीस दलात कुजबुज

0
WhatsApp-Image-2026-04-24-at-08.13.21.jpeg


स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यकाळ साधारणतः तीन वर्षांचा असतो. मात्र अद्याप पूर्ण कार्यकाळ बाकी असताना पोलीस निरीक्षक उदय खंडेराय  यांना अचानक आर्थिक गुन्हे शाखेत बदली देण्यात आली. त्यांना खो सॆन्यात अतुल भोसले यशस्वी झाले आहेत. त्यांचा कार्यकाळ अजून शिल्लक होताच. कार्यक्षमता बदलली की खुर्ची बदलते हा नवीन प्रशासनिक सिद्धांत लागू झाला की काय, असा सवाल आता पोलीस वर्तुळात ऐकू येत आहे.

काल दुपारी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप  हे नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर अनेक तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. त्या बैठकीत नेमके काय ठरले, कोणत्या फाइलने कोणाला नमस्कार केला आणि कोणत्या आदेशाने अचानक वेग घेतला, हे अद्याप गूढच आहे. मात्र रात्रीतच आदेश निघाले आणि खंडेराय  यांची बदली झाली, तर अतुल भोसले यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी मिळाली.

विशेष म्हणजे पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया पाटील यांनी 18 नोव्हेंबर 2025 रोजी सेवा ज्येष्ठता यादीवर स्वाक्षरी केली होती. त्या यादीत तब्बल 3183 अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यात अतुल भोसले यांचा क्रमांक 2761 असल्याचे सांगितले जाते. त्यांची पोलीस निरीक्षक पदावरील नियुक्ती तारीख 18 जून 2024 असल्याने अद्याप आवश्यक तीन वर्षांचा अनुभव पूर्ण झालेला नाही.ते तर सोडाच अद्याप दोन वर्ष सुद्धा पूर्ण झाली नाहीत त्यांना पोलीस निरीक्षक होऊन. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्त्वाच्या पदासाठी किमान तीन वर्षांचा अनुभव आणि विविध श्रेणीतील कामकाजाचा अनुभव अपेक्षित असतो. चोरी, दरोडे, खंडणी आणि गुंतागुंतीचे तपास हाताळणारी ही शाखा जिल्ह्याचा इंटेलिजन्स इंजिन मानली जाते. येथे अधिकारी निवडताना त्यांचे खबरी जाळे, जिल्ह्याची माहिती आणि तपास कौशल्य तपासले जाते. पण या वेळी पात्रतेपेक्षा वेगाला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा आहे.सोबतच त्यांनी अ श्रेणीची दोन पोलीस ठाण्यांचा कारभार पाहिलेला असावा.

जिल्ह्यात अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षानुवर्षे सेवा बजावत आहेत. त्यामुळे आता स्वतःपेक्षा कमी अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला सलाम करण्याची वेळ आल्याने काहींच्या चेहऱ्यावर अधिकृत हास्य आणि अनधिकृत नाराजी दिसत असल्याचे सांगितले जाते.

स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हा पोलीस अधीक्षकांचा उजवा हात मानला जातो. पोलीस ठाणे आणि वरिष्ठ प्रशासन यांच्यातील समन्वयाचा तो महत्त्वाचा दुवा असतो. मात्र आता नव्या अधिकाऱ्याच्या आगमनानंतर बीट बदल, तपास बदल आणि कदाचित निष्ठाही बदलतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या नियुक्तीमागे नेमका कोणता योग, काळ, की कार्ड कामी आले याबाबत अधिकृत माहिती नसली तरी पोलीस दलात चर्चा मात्र रंगली आहे. काही जण उपरोधाने म्हणतात, भगवान श्री गणेशाची कृपा आणि मोदकांचा प्रसाद असेल तर नियमांनाही वाकावे लागते! दरम्यान, नियमांची अंमलबजावणी नेमकी कोणासाठी आणि अपवाद नेमके कोणासाठी, हा प्रश्न मात्र नांदेड पोलीस दलात अजूनही अनुत्तरितच आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *