समन्वयाअभावी डाबकी रोडचे रुंदीकरण रखडले:बैठकीत महापौर, आयुक्तांनी घेतला आढावा
![]()
महापालिकेत गुरुवारी डाबकी रोडच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणासह विविध नागरी कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत महापौर शारदा रणजीत खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि आयुक्त सुनिल लहाने उपस्थित होते. डाबकी रोडवरील हॉस्पिटल आणि कॉम्प्लेक्सशी संबंधित अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले. नगररचना विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी वारंवार मार्किंग करूनही अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून कारवाई न झाल्याचे बैठकीत नमूद झाले. न्यायप्रविष्ट प्रकरणे विधी विभागाशी समन्वय साधून निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. विभागांतील समन्वयाअभावी गेल्या दोन वर्षांपासून काम संथगतीने सुरू असून नागरिकांना त्रास होत असल्याचे प्रशासनाने मान्य केले. तातडीने कारवाई करून कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. डाबकी रोड हा जुने शहरातील वर्दळीचा मार्ग असून वाढत्या रहदारीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावित १८ मीटर रुंदीकरणात दोन्ही बाजूंनी तीन मीटर विस्तार आणि अंडरग्राउंड केबलचे काम समाविष्ट आहे.बैठकीत मलेरिया विभागासाठी फवारणीकरिता २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक प्रभागात आठवड्यातून किमान एकदा फवारणी करण्याचे नियोजन करण्यास सांगितले.
