हिंदीनंतर इंग्रजी पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब:शिवरायांचा अपमान सहन होणार नाही; साताऱ्यात आज मोर्चा

0
730-x-548-new-2026-04-24t092509574_1777002883.jpg




इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हिंदी माध्यमातील पुस्तकातून हा नकाशा वगळण्यात आला होता. मात्र आता इंग्रजी माध्यमातील पुस्तकातूनही तोच नकाशा हटवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निर्णयावरून वाद अधिकच चिघळला असून, एनसीईआरटीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी याप्रकरणी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार करून योग्य ती दखल घेतली जाईल, असे विधान परिषदेत सांगितले होते. मात्र, या पाठपुराव्यानंतरही कोणतीही सकारात्मक कारवाई न झाल्याने राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका होत आहे. उलट, त्यांच्या पत्रानंतरच इंग्रजी पुस्तकातूनही नकाशा हटवण्यात आल्याचा आरोप होत असल्याने हा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहत आहे. शिवतीर्थ येथून सकाळी दहा वाजता निषेध मोर्चाला सुरुवात होणार असून, यात शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसले यांची उपस्थिती या आंदोलनाला अधिक महत्त्व देणारी ठरणार आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आंदोलकांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, विधान परिषदेत 11 मार्च 2026 रोजीच शिक्षण राज्यमंत्र्यांनी मान्य केले होते की, मराठा साम्राज्याचा नकाशा हिंदी आणि उर्दू पुस्तकांत दिसत नाही. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे लेखी मागणी केली होती. मात्र केंद्राने या पत्राची साधी दखलही घेतली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने पाठपुरावा करूनही एनसीईआरटीने उलट निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या स्वाभिमानाला धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हा फक्त नकाशा नाही, तर आपल्या इतिहासाचा अभिमान आहे, असे आंदोलकांचे मत आहे. त्यांनी याला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड असे संबोधले आहे. या मुद्द्यावर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे प्रकरण उघड झाले असल्याचे सांगितले जात आहे. कार्यकर्ते ऋषिकेश निकम यांनी माहिती अधिकाराचा वापर करून या बदलांची माहिती मिळवली. त्यानंतरच या विषयावर राज्यातील राजकीय नेते आणि सरकार सक्रिय झाले, असा दावा केला जात आहे. आंदोलकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, जर राष्ट्रीय स्तरावर इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असेल, तर राज्यातील शिक्षण विभाग काय करत होता? इतका महत्त्वाचा विषय लक्षात कसा आला नाही? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. नकाशा हटवल्यामुळे देशभर चुकीचा संदेश मराठा साम्राज्याचा ‘अटक ते कटक’ विस्तार दाखवणारा नकाशा हा केवळ भौगोलिक माहिती नसून तो मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. हा नकाशा हटवल्यामुळे देशभर चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भविष्यातील पिढ्यांना आपल्या इतिहासाची खरी ओळख कशी होणार, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याशिवाय, आंदोलकांनी असेही म्हटले आहे की, इतर राज्यांनी त्यांच्या हितासाठी दिल्लीपर्यंत जाऊन दबाव निर्माण केला. मात्र महाराष्ट्रातील खासदार आणि नेत्यांनी तसा प्रयत्न केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे नेते या मुद्द्यावर शांत का आहेत, असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *