मनपाच्या पीपीपी रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह:खर्चात दुप्पट तफावत, माजी विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना दिले निवेदन; चौकशीची मागणी
![]()
पुणे मनपाच्या पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलअंतर्गत झालेल्या रस्ते बांधकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, क्रेडिट नोटच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर रस्ते बांधकामाची कामे देण्यात आली आहेत. हे मॉडेल कायदेशीरदृष्ट्या वादग्रस्त असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात झालेल्या कामांची आणि त्याच्या खर्चाची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीपीपी मॉडेलअंतर्गत एकूण २० रस्ते कामे देण्यात आली आहेत, ज्यांची यादी निवेदनासोबत जोडण्यात आली आहे. ही सर्व कामे प्रशासकीय राजवटीत मंजूर करण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत एकूण रस्त्यांची लांबी ३९.०३ किलोमीटर असून, टेंडरची एकूण रक्कम १०२६ कोटी रुपये आहे. यानुसार, प्रति किलोमीटर सरासरी खर्च २६ कोटी २८ लाख रुपये इतका येतो. मनपाच्या नियमित रस्ते बांधकामाचा सरासरी दर १२ ते १३ कोटी रुपये प्रति किलोमीटर असताना, पीपीपी मॉडेलअंतर्गत हा खर्च जवळपास दुप्पट असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. स्पेसिफिकेशननुसार दरात काही प्रमाणात फरक असू शकतो, परंतु इतकी मोठी तफावत चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आले होते. तसेच, पूर्ण झालेल्या कामांची तपासणी करण्यासाठीही सल्लागार नेमण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे कामांच्या गुणवत्तेबाबत आणि संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्यतः रस्ता बांधकामासाठी ८ इंच मुरूम, ८ इंच जीएसबी, ४ इंच डीएलसी आणि ८ इंच एम४० काँक्रीट या स्पेसिफिकेशननुसार काम केले जाते. या निकषांचे पालन प्रत्यक्षात झाले आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात पारदर्शकता राखण्यासाठी आणि आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
