निसर्गचक्र राखणे मानवी जीवनासाठी महत्त्वाचे:उपवनसंरक्षक अर्जुना यांचे जलपात्र वितरण कार्यक्रमात प्रतिपादन, वॉर संस्थेचा पुढाकार

0
f66e555e-869d-433e-8db9-e5c9b683ea32_1776962158253.jpg




मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य ठेवण्यासाठी निसर्गचक्र कायम राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. पशु, पक्षी आणि जंगल या सर्व बाबींचे योग्य संतुलन राखणे ही काळाची गरज असून, मानवी जीवन या चक्राचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हे चक्र राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून बडनेरा रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये जलपात्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाईल्ड अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटी (वॉर) च्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अर्जुना के. आर. प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी कमलेश पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य नितीन कोळी, सहाय्यक वनसंरक्षक योगेश तापस व डॉ. मयूर भेलुने, सामाजिक वनिकरण विभागाचे सुमित कुमार, वनपाल बाबुराव खैेरकर तसेच वनरक्षक आकाश सारडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पर्यावरण जनजागृतीच्या या विशेष कार्यक्रमात अर्जुना यांनी पुढे सांगितले की, निसर्गात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती व पशु-पक्ष्यांचा अधिवास आहे. तो शाबूत राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त होते. अशावेळी घराच्या परिसरात जलपात्र ठेऊन त्यांची तहान भागवण्याचे काम आपण केले पाहिजे. ही जबाबदारी सर्व विद्यार्थी-शिक्षक पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात जलपात्रांचे वितरणही करण्यात आले. वाईल्ड अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कंचनपुरे यांनी संस्थेबद्दल माहिती देत वर्षभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचीही माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अपर्णा अर्पाले यांनी केले. प्रारंभी प्राचार्य नितीन कोळी व शाळेतील शिक्षकांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी इव्हेंट कॉर्डिनेटर माधुरी इंगळे, प्रायमरी कॉर्डिनेटर सुप्रिया गणवीर, जयश्री कपिले, मेघा पांडे, प्रांजली ताकपिरे, रंजना शिरभाते, प्रतिभा पाटील, जानवी कल्याणकर, सपना गडेचा, अमृता उपाध्याय, अनुसया शर्मा, मेघना सहारकर तसेच शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पंकज आकांत यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed