दिव्यांग अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
बिलोली (प्रतिनिधी)- दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे गंभीर स्वरूपाच्या लैंगिक गुन्ह्यांवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिलोली येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी योगेश भिमराव कोडवाड याला दोषी ठरवून भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२)(ल) तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम कलम ४(२), ६ अंतर्गत शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी कारावास व २५,००० रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त तीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित दिव्यांग अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत घरात प्रवेश केला व तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडितेने उपचारादरम्यान तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल एन. बहादरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सरकार पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सादर पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने २२ एप्रिल २०२६ रोजी निकाल देत शिक्षा सुनावली.
या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप भिमराव कुंडलवाडीकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच अॅड. जयेश अवचार, अॅड. योगेश सतीश पुंडे, पोलीस कर्मचारी पी. आय. इजुळकंठे व न्यायालयीन कर्मचारी सय्यद गौस सहकार्य केले.
न्यायालयाच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत असून अल्पवयीन व दिव्यांग मुलांच्या सुरक्षेबाबत कठोर संदेश समाजात गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 112
