पुणे मेट्रोची नवीन फिडर बस सेवा सुरू:पीसीएमसी ते काळेवाडी फाटा मार्गावर प्रवाशांना स्वस्त आणि वेगवान प्रवास

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-22t16_1776856938.png




पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) प्रवाशांसाठी ‘पहिली आणि शेवटची मैल कनेक्टिव्हिटी’ अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी ‘मेट्रो फिडर बस मार्ग क्र. ३१’ अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे. ही नवीन बस सेवा पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा या दरम्यान धावणार असून, यामुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन बस मार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजय नगर, तापकीर नगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती आणि ज्योतिबा नगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रो स्थानकाशी जोडण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना आता मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा खाजगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. या मार्गावर एम.एम. शाळा, जिजामाता रुग्णालय परिसर आणि विविध खाजगी शिकवणी वर्ग असल्याने विद्यार्थी आणि इतर प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सुरक्षित आणि वेळ वाचवणारी ठरेल. प्रवाशांच्या खिशाला परवडेल अशा दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवासासाठी किमान भाडे फक्त १० रुपये आणि कमाल भाडे २० रुपये निश्चित करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानकावरून पहिली बस सकाळी ६:३० वाजता, तर काळेवाडी फाटा येथून सकाळी ७:०० वाजता सुटेल. अंतिम बस रात्री ९:०० वाजता पी.सी.एम.सी. वरून आणि ९:३० वाजता काळेवाडी फाटा येथून सुटेल. गर्दीच्या वेळी दर १५ मिनिटांनी आणि कमी गर्दीच्या वेळी दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध असेल. ही बस सेवा वर्तुळाकार पद्धतीने धावणार आहे. यामध्ये कुंदन हॉटेल, गोकुळ हॉटेल, शगुन चौक, जिजामाता रुग्णालय, लकी बेकरी, विजय नगर, अविनाश मंगल कार्यालय, एम.एम. शाळा, तापकीर नगर, रहाटणी फाटा, कराची चौक, लाल मंदिर आणि मोरवाडी चौक अशा प्रमुख थांब्यांचा समावेश आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, सध्या एकूण १० मेट्रो स्थानकांसाठी ८३ फिडर बसेस २३ वेगवेगळ्या मार्गांवर सेवा देत आहेत. या फिडर बस सेवेचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल. प्रवाशांना काही तक्रार किंवा माहिती हवी असल्यास मेट्रोच्या मदत क्रमांकावर (१८००२७०५५०१) किंवा पी.एम.पी.एम.एल. च्या हेल्पलाईनवर (०२०-२४५४५४५४) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed