कचऱ्याच्या डब्यात लपवले होते 6 कोटींचे 'ड्रग्स':'बार गर्ल'ला ठोकल्या बेड्या, तीन दिवस वॉच आणि पालिकेचा सर्व्हे असल्याचे भासवून कारवाई

0
db-temp-cover-marathi-2026-04-22t165648110_1776857646.jpg




कल्याण-टिटवाळा परिसरातील पद्मावती रॉयल सोसायटीमध्ये पोलिसांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार रचत तब्बल ६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, घराची झडती सुरू असताना आरोपी महिलेने हे अंमली पदार्थ कचऱ्याच्या डब्यात लपवले होते. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ती सुटू शकली नाही. याप्रकरणी अश्विनी पॉल या महिला पेडलरला अटक करण्यात आली असून, मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. टिटवाळ्याच्या पद्मावती रॉयल सोसायटीमध्ये काहीतरी संशयास्पद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस पथक या परिसरात दबा धरून होते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) अधिकारी असल्याचे भासवले आणि सोसायटीत ‘सर्व्हे’ सुरू केला. शनिवारी दुपारी पोलिसांना खात्री पटताच त्यांनी संशयित अश्विनी पॉल हिच्या इमारतीत पोहोचले. कचऱ्याच्या डब्यात दडवले ६ कोटींचे ड्रग्ज घरात शिरल्यानंतर पोलिसांनी अश्विनीची कसून चौकशी केली. सुरुवातीला तिने टोलवाटोलवी केली, मात्र नंतर आपण बारमध्ये काम करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घराची झडती घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण घर पालथे घातले तरी काहीच सापडत नव्हते. अखेर एका सतर्क पोलीस अधिकाऱ्याची नजर कोपऱ्यात असलेल्या कचऱ्याच्या डब्यावर गेली. तो डबा उघडताच पोलिसांना धक्का बसला; त्यात तब्बल ६ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ दडवून ठेवण्यात आले होते. बार गर्ल ते गुन्हेगारी विश्व: असा झाला प्रवास मूळची पुण्याची असलेली अश्विनी पॉल ही दहावी नापास आहे. २०१२ मध्ये ती नोकरीच्या शोधात मुंबईत आली आणि बार गर्ल म्हणून काम करू लागली. तिने नवी मुंबई, कल्याण अशा विविध भागात वास्तव्य केले. अश्विनीचा लिव्ह-इन पार्टनर जेलमध्ये असताना त्याला भेटण्यासाठी ती कारागृहात जात असे. तिथेच तिची ओळख साकीनाका येथील ड्रग्ज तस्कर इरफान अन्सारी याच्याशी झाली. अन्सारीने तिला जास्त कमाईचे आमिष दाखवले आणि अश्विनी या काळ्या धंद्यात ओढली गेली. तिचा पार्टनर तिला माल पुरवायचा आणि ती त्याची विक्री करायची. पार्टींमध्ये ड्रग्ज सप्लायचा संशय अश्विनीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि मीरा रोड परिसरातील हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा पोलिसांना संशय आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि पुरवठ्याची ही साखळी कुठपर्यंत पसरली आहे, याचा तपास आता अंमली पदार्थ विरोधी विभाग करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed