औंढ्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला शिवागीळ:पदोन्नतीवरून झाला वाद, अंगणवाडी मदतनीसावर अदखलपात्र गुुन्हा दाखल
![]()
औंढा नागनाथ येथे पदोन्नतीच्या कारणावरून बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेस शिवीगाळ करून शासकिय कामास मज्जाव करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० सायंकाळी अदखलपात्र गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील अंगणवाडीमध्ये मागील १० वर्षापासून कल्पना यंबल ह्या मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदोन्नतीसाठी पात्रताधारण केल्यांनतर काही दिवसांपुर्वी पदोन्नतीचा प्रस्ताव औंढा नागनाथ बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ तालुक्यात पदोन्नतीसाठी पद रिक्त झाल्यानंतर तातडीने पदोन्नती दिली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे यंबल यांना जागा रिक्त होण्याची प्रतिक्षा लागली होती. दरम्यान, सोमवारी ता. २० दुपारच्या सुमारास बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे ह्या काम करीत बसल्या होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका कल्पना तेेथे आल्या त्यांनी मला पदोन्नती का देत नाही असे म्हणत त्यांच्यासोबत वाद सुरु केला. यावेळी प्रकल्प अधिकारी इंगळे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जागा रिक्त झालेली नाही त्यामुळे थोडे थांबा असे म्हटल्यानंतर कल्पना यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कल्पना यांनी प्रकल्प अधिकारी संगिता इंगळे यांना शिवीगाळ करून काम करण्यास मज्जाव केला. या प्रकरणी संगिता इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी कल्पना यंबल यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. जमादार पठाण, दिलीप नाईक पुढील तपास करीत आहेत.
