'लग्नात विघ्न' म्हणीचा अकोल्यात प्रत्यय:बार्शीचे वऱ्हाड उपनिबंधक कार्यालयातच ताटकळले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विवाह नोंदणी रखडली

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-21t155244377_1776766943.jpg




आज जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, याचा फटका बसला आहे नव वधू-वराला. ‘लग्नात विघ्न’ अशी आपल्याकडे म्हण आहे, याचा प्रत्यय आला आहे सोलापूरच्या बार्शी येथून आलेल्या वधू पक्षाला. कर्मचारी संपावर गेल्याने सोलापूर येथून आलेल्या वधू-वराला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. दीड महिना नोटीस देऊन देखील ठरलेल्या दिवशी गेलेल्या वऱ्हाडाला कार्यालयात ताटकळत बसावे लागले असून नियोजित वेळेत विवाह नोंदणी होऊ शकलेली नाही. अकोल्याची हर्षा आणि सोलापूरच्या बार्शी येथील रविकांत लांडे यांचा विवाह नोंदणी पद्धतीने करण्यासाठी दीड महिना आधीच अर्ज करून आजची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र लग्नासाठी 50 वऱ्हाडी अकोल्यात दाखल झालेले असतानाच, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी संपावर असल्याने या विवाह नोंदणीत मोठा अडथळा निर्माण झाला. नियोजित दिवशी लग्न होऊ न शकल्याने हताश झालेल्या वधू आणि वर पक्षाकडील मंडळींनी अखेर अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले तरी देखील विवाहाची नोंदणी न झाल्याने हे लग्नच अद्याप होऊ शकलेले नाही. त्यामुळे वधू-वर पक्षातील 60-70 वऱ्हाडी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकळले आहेत. या वऱ्हाडींमध्ये काही लहान मुले देखील असल्याने त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लग्नात विघ्न ही म्हण या ठिकाणी खरी ठरल्याची चर्चा होत आहे. आता यावर नेमका तोडगा काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून, यात एकट्या ठाणे जिल्ह्यातील 12 हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे शाळा-महाविद्यालये, शासकीय रुग्णालये आणि प्रशासकीय कामकाजाला मोठा फटका बसला असून, जोपर्यंत मागण्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी दिला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks