घराचा आधार हरवला, पण घर अजून उभे आहे:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एक सक्षम महिला म्हणून देशभरात नावारुपास येतील – भुजबळ
![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक सक्षम महिला म्हणून देशभरात नावारुपास येतील, असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी व्यक्त केला. घराचा आधार हरवला. पण घर अजूनही हातात हात घेऊन उभे आहे. सुनेत्राताई अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. त्यामुळे आपल्याला ताईंसोबत खंबीरपणे उभे राहायचे आहे, असे ते म्हणालेत. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत सांगता सभा झाली. या सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीकरांना सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आाहन केले. ते म्हणाले, महायुती व महाविकास आघाडीतील पुढाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुनेत्राताईंना पाठिंबा दिला. तसेच काँग्रेस अध्यक्षांनाही पाठिंबा देण्यास सांगितले. याविषयी सर्वांचे आभार. पण इतर उमेदवारांनीही सुनेत्रा पवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याची गरज होती. कारण, घराचा आधार हरवला तरी घर अजूनही हातात हात घेऊन ठामपणे उबे आहे. बारामतीकरांना वाटेल, सुनेत्रा पवार निवडूनच येणार आहेत, आपल्या एका मताने काय फरक पडेल. पण असे चालणार नाही. आपल्यासाठी एकेक मत महत्त्वाचे आहे. सुनेत्रा पवार अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. त्यामुळे आपल्याला ताईंसोबत खंबीरपणे उभे राहायचे आहे. सुनेत्रा पवार देशातील एक सक्षम नेत्या भुजबळ यांनी यावेळी सुनेत्रा पवार देशातील एक सक्षम महिला नेत्या म्हणून पुढे येतील असा ठाम विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, देशात अनेक महिला मुख्यमंत्री झाल्या. उपमुख्यमंत्री झाल्या. राष्ट्रपती झाल्या. पंतप्रधान झाल्यात. त्यामुळे ताईंना तुम्ही केवळ राज्याच्या नाही, तर देशाच्या नेत्या म्हणून निवडून देणार आहात. त्यामुळे आपल्या सर्वांना मतदान करणे महत्त्वाचे आहे. सुनेत्रा पवार एक सक्षम महिला म्हणून देशात नावारुपास येतील यात शंका नाही. त्यांच्यात जनतेचे दुःख समजून घेण्याची संवेदनशीलता आहे. त्यांना बारामतीला देशाच्या नकाशावर एका नव्या उंचीवर न्यायचे आहे. भुजबळांचे भाषण सुरू असतानाच सुप्रिया सुळे व्यासपीठावर छगन भुजबळांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे आगमन झाले. त्यावेळी भुजबळांसह सर्वांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सुप्रिया स्टेजकडे येताना अजित पवारांच्या नावाच्या घोषणांनी अवघा आसमंत दणाणला. तेव्हा भुजबळ म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी सर्वप्रथम सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून महाविकास आघाडीनेही सुनेत्राताईंना पाठिंबा दिला. आपल्याला अश्रू पुसायचे आहेत. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याचा निर्धार करायचा आहे, असे भुजबळ म्हणाले.
