पुणे-वाराणसी 'अमृत भारत' एक्सप्रेसला मंजुरी:पुणे-जबलपूर रेल्वेही नियमित होणार, प्रवाशांची प्रतीक्षा संपली

0
eb3db0d7-a96b-4332-b38f-07a8a71131cb_1776689417397.jpg




केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून या संदर्भातील अधिकृत मंजुरी कळवली आहे. पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक काशी, वाराणसी आणि प्रयागराजला जात असतात. प्रवाशांची ही गरज ओळखून मंत्री मोहोळ यांनी हडपसर ते बनारस दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याला सकारात्मक प्रतिसाद देत ‘अमृत भारत’ या आधुनिक रेल्वेला मंजुरी दिली आहे. ही गाडी हडपसर टर्मिनलवरून सुटणार असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना थेट वाराणसीपर्यंत जलद सेवा मिळेल. मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन या गाड्यांच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा केली होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वेचे अर्थकारण या दोन्ही बाबी रेल्वे मंत्रालयाला पटवून देण्यात त्यांना यश आले. या गाड्यांमुळे केवळ पर्यटनच नाही, तर व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. लवकरच या दोन्ही गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होऊन त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात, पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. यापुढे ही गाडी गाडी संख्या २०१६१/२०१६२ ‘पुणे-जबलपूर एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाईल. ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना आता वर्षभर आगाऊ आरक्षण करणे सोपे होणार असून, विशेष गाड्यांचे जास्त तिकीट दरही कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना काशी-प्रयागराजच्या तीर्थयात्रेसाठी थेट आणि आरामदायी रेल्वे हवी होती. अमृत भारत एक्सप्रेसच्या मंजुरीमुळे आणि पुणे-जबलपूर गाडी नियमित झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks