श्री शिवाजी महाविद्यालयात रंगणार संत ज्ञानेश्वर महाराजांवर निरूपण:निरुपणकार गणेश शिंदे, गायिका सन्मिता शिंदे यांचे हाेणार गायन
![]()
प्रतिनिधी | अकोला संत परंपरेचा अमूल्य वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर आजही तितक्याच श्रद्धेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केला जातो. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख सभागृहात संपन्न होणार आहे. गत काही दिवसांपासून सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातून संस्कृती जतनाचा संदेश देण्यात येत आहे. या कार्यक्रमांना अकोलेकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून आयोजित या विशेष कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा पुढाकार लाभला असून सांस्कृतिक जतन आणि प्रसाराच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान अकोल्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित एक बहारदार सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले असून, या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. अकोला आणि परिसरातील रसिक नागरिक, विद्यार्थी, तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि संगीताचा हा अनोखा संगम अनुभवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संगीत आणि निरूपण यांचा सुंदर संगम : कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे आपल्या मधुर आणि भावस्पर्शी गायनातून या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची देणार आहेत. अभंग, ओव्या आणि भक्तिगीतांच्या सादरीकरणातून त्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे भावविश्व उलगडून दाखवतील. संगीत आणि निरूपण यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. प्रभावी, ओजस्वी निरुपण या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात निरुपणकार गणेश शिंदे यांचे प्रभावी आणि ओजस्वी निरूपण. ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण, त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास, अध्यात्मिक साधना, तसेच त्यांनी समाजाला दिलेला ज्ञानाचा अमृतस्रोत याचे जिवंत चित्र उभे करणार आहेत. त्यांच्या निरूपणातून ज्ञानेश्वरांच्या विचारांची गूढता आणि व्यापकता प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचेल.
