झटपट गोरे होण्याचा नाद जिवावर!:संभाजीनगरनंतर नागपुरात पाकिस्तानी क्रीममुळे महिलांना किडनीचे विकार; FDA ची मोठी कारवाई
![]()
छत्रपती संभाजीनगरनंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही ‘पाकिस्तानी ब्युटी क्रीम’च्या वापरामुळे अनेक महिलांना किडनीचे गंभीर आजार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील रील आणि जाहिरातींना बळी पडून झटपट गोरे होण्यासाठी वापरण्यात येणारी ही क्रीम आता महिलांसाठी ‘स्लो पॉयझन’ ठरत आहे. नागपुरातील एकाच रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत तब्बल १८ महिलांना या क्रीममुळे किडनीचे आजार जडल्याचे डॉक्टरांच्या निदानातून स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, पाकिस्तान निर्मित या क्रीम्समध्ये पारा (Mercury) या धातूची मात्रा प्रमाणाबाहेर असते. जेव्हा ही क्रीम चेहऱ्यावर लावली जाते, तेव्हा त्यातील मर्क्युरी त्वचेच्या छिद्रांमधून शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेलेला हा घातक घटक थेट रक्तात मिसळतो. रक्तातील हे विष फिल्टर करताना किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि कालांतराने किडनी निकामी होण्यासारखे गंभीर विकार उद्भवतात. अन्न व औषध प्रशासनाची (FDA) मोठी कारवाई नागपूर शहरात या क्रीम्सची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच ‘एफडीए’ने (अन्न व औषध प्रशासन) शोधमोहीम राबवली. मार्केटमधून या क्रीम्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस ब्युटी क्रीम यांसह विविध पाकिस्तानी क्रीम्स जप्त करण्यात आल्या. तसंच पारले गोल्ड, गोरे साबण आणि मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम यांचाही समावेश आहे. तज्ज्ञांचा इशारा : रीलच्या नादी लागू नका! अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावरील ‘इन्स्टंट फेअरनेस’चे दावे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या क्रीम्स वापरतात. ” चेहऱ्यावर चकाकी आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या क्रीम्स प्रत्यक्षात शरीराच्या अंतर्गत अवयवांना पोखरत आहेत. नागरिकांनी लेबल न वाचता किंवा बनावट विदेशी बनावटीची उत्पादने वापरणे टाळावे. अशा क्रीम्स वापरून कोणीही कायमस्वरूपी गोरे होऊ शकत नाही. उलट, यामुळे त्वचेचा कर्करोग आणि किडनी निकामी होण्याचा धोका १०० टक्के असतो,” असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
