बनावट एटीसी परवानग्यांचा पुण्यात महाघोटाळा उघड:विमान अपघाताचा धोका; विकासक-अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
![]()
पुणे शहरात बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे विमान अपघाताचा धोका निर्माण झाला असून, विकासक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विकासक आणि महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने हे बनावट परवाने मिळवून इमारतींना मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी आणि सिंहगड रोड परिसरातील उंच इमारतींच्या मंजुरीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे. एअर फोर्सच्या गांधीनगर कार्यालयाने महापालिकेला कळवले आहे की, आंबेगाव येथील एका प्रकल्पासाठी सादर केलेली परवानगी ‘पूर्णपणे बनावट’ आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे परवाने मिळवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले आहे. ६ एप्रिल रोजी पुरावे देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप घरत यांनी केला. एनडीए आणि मिलिटरीची संवेदनशील ठिकाणे पुण्यात असताना, सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवणे हा राष्ट्रद्रोहाचा प्रकार असल्याचे घरत यांनी म्हटले आहे. खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भ्रष्टाचाराच्या या इमारतींना तात्काळ टाळे ठोकून दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही घरत यांनी दिला.
