आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर:MIM नगसेविका सहर शेख म्हणाली- सगळे आरोप बिनबुडाचे; वानखेडेवरील फोटोवरही स्पष्टीकरण
![]()
ठाणे महानगरपालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख यांनी अखेर समोर येत आपली बाजू मांडली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात पोलिसांशी चर्चा केल्यानंतर “करारा जवाब मिलेगा” असा इशारा देणाऱ्या सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत, आमची सर्व कागदपत्रे कायदेशीर आणि खरी असल्याचा दावा केला असून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अखेर माध्यमांसमोर येत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. मीडियाकडून खोट्या बातम्या पसरवून घराघरात अफवा पोहोचवण्यात आल्या, त्यामुळे आता सत्य समोर आणण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे म्हणत त्यांनी पत्रकारांनाच धारेवर धरले. उत्तर देण्यासाठी उशीर का झाला, हे ठरवण्याचा अधिकार माध्यमांना नसून तो आमचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे त्यांनी सुनावले. तसेच, आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून अद्याप न्यायालयाने कोणताही निकाल दिला नसताना मीडिया आपल्याला दोषी कसे ठरवू शकते, असा संतप्त सवालही सहर शेख यांनी यावेळी उपस्थित केला. सहर शेख म्हणाल्या, तुम्ही एका ताकदवर आमदाराला हरवत आहात, अत्यंत संघर्ष करत, वडिलांना साथ देत तुम्ही निवडणूक जिंकला आहात, तर तो आनंद तुम्हाला होत असतो. त्यामुळे, कैसे हराया… ही माझी आतमधून, मनातून आलेली स्टेटमेंट आहे. मात्र, याच गोष्टीला घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वानखेडे स्टेडियमवरील फोटोबाबत स्पष्टीकरण सहर शेख या वानखेडे स्टेडियमवर असल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, आमच्या गटनेत्याने पत्रकारांना सांगितले की, आमच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले, पण दुसऱ्या दिवशी मी वानखेडे स्टेडियमवर दिसले असा आरोप तुमच्याकडून केला जात आहे. मात्र, निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी वानखेडेवर गेले असे गटनेत्याने सांगितले का? असा सवाल शेख यांनी उपस्थित केला. तसेच सगळे कन्फ्युजन पसरवले जात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
