पुणे बालपुस्तक जत्रा 30 एप्रिलपासून:गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे 4 मे पर्यंत विनामूल्य आयोजन

0
ae414029-fe03-4335-b2ad-381541a2e902_1776690433830.jpg




पुणे बालपुस्तक जत्रेचे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही जत्रा विनामूल्य भरवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती मिळावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा स्पर्श व्हावा, हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. मुलांसोबत पालक आणि शिक्षकांनाही नावीन्यपूर्ण कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार उपस्थित होते. मागील वर्षी या महोत्सवाला मुलांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, ज्यात सुमारे ५५ ते ६० हजार मुलांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी बालसाहित्याची ७५ दालने होती, जी यंदा १०० पर्यंत वाढवण्यात आली आहेत. या वर्षीच्या जत्रेत साहित्य आणि कलासंस्कृतीच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यात बालसाहित्याची शंभर दालने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामीण व साहसी खेळ, तसेच खाद्यजत्रेतून खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. मुलांचे गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण असे कार्यक्रम अनुभवता येतील. मुलांना साहित्य आणि कलेची गोडी लागावी यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसोबत या जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीला पुढे नेण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सुनील महाजन यांनी केले आहे. जत्रेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks