घाटनांद्र्यात ३५०० हेक्टरवर मिरची लागवड:एकरभरासाठी ४० हजार खर्च, शेतकऱ्यांचा जोखमीतून नफा शोधण्याचा प्रयत्न‎

0
240_177659751269e4ba08c0be1_80941514577.jpg




प्रतिनिधी | घाटनांद्रा कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा मोठा कल दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. यंदा लागवडीचा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. तरीही ‘जोखीम घेतल्याशिवाय नफा नाही’ या विश्वासावर शेतकरी मिरचीला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये घाटनांद्रा परिसरात २५० ते २७५ हेक्टरवर मिरची लागवड होत होती. यंदा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ३५०० हेक्टरच्या वर लागवड झाली आहे. मे महिन्यापर्यंत लागवड सुरू राहणार असल्याचे शेतकरी सांगतात. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरही उत्साह कमी झालेला नाही. यंदा मिरची लागवडीचा एकरी खर्च ४० हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. मल्चिंग पेपर, रोपे, खत, मजुरी या सर्व घटकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी ११०० रुपयांना मिळणारा मल्चिंग पेपर यंदा १८०० रुपयांवर गेला आहे. रोपांची किंमत १.२० रुपयांवरून १.७० रुपयांपर्यंत वाढली आहे. मजुरी ३०० रुपयांवरून ५०० रुपयांवर पोहोचली आहे. खतांचे दर १९०० वरून २१०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. खर्च वाढत असतानाच मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. सध्या बाजारात मिरचीला सुमारे ४००० रुपये दर मिळत आहे. हा दर खर्चाच्या तुलनेत अपुरा ठरत आहे. पुढे भाव वाढेल, नुकसान भरून निघेल, या आशेवर शेतकरी टिकून आहेत. शालिक मोरे म्हणाले, यंदा मिरची लागवडीचा खर्च खूपच वाढला आहे. मल्चिंग पेपर, मजुरी सगळंच महागलंय. दुसरा पर्याय नाही. मिरचीच लावली. आता भाव वाढेल अशी अपेक्षा आहे. सागर मोरे म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा जवळपास दुप्पट खर्च आला. सध्या बाजारभाव परवडणारा नाही. पुढे दर वाढतील, या आशेवर टिकून आहोत. दोन एकरावर मिरचीची लागवड केली आहे. दिगंबर मोरे म्हणाले, मिरचीचं पीक पटकन पैसे देतं म्हणून लागवड वाढवली. खर्च परवडत नाही. योग्य बाजारभाव हवा आहे. खर्च निघून थोडाफार नफा मिळाला तरी समाधान आहे. व्यापाऱ्यांनी यंदा चांगला दर द्यावा. यंदा तरी व्यापाऱ्यांनी मिरचीला चांगला दर द्यावा, अशी अपेक्षा आकाश मोरे, विलास मोरे, रवी निकम, अनिल मोरे, दिगंबर मोरे, दीपक मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनिश्चित बाजारभाव याच्या कचाट्यात शेतकरी पुन्हा आशेच्या जोरावर शेती करताना दिसत आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks