भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर:'राजा' कायम, पण देशाची संरक्षण स्थिती तणावात; यंदाचा पीक-पाण्याचा अंदाज काय?
![]()
संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील बळीराजाचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. ३७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या घटमांडणीनुसार, यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहणार असला तरी, देशाची संरक्षण आणि आर्थिक स्थिती आव्हानात्मक राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाऊस आणि पिकांच्या बाबतीतही संमिश्र अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी करण्यात आलेल्या घटमांडणीचे निरीक्षण आज सकाळी करण्यात आले. यानुसार देशाचा ‘राजा’ (सत्ता) कायम असेल, म्हणजेच सत्ताधारी बदलाचे संकेत दिसत नाहीत. देशाची संरक्षण स्थिती तणावपूर्ण असेल, सीमांवरील हालचाली वाढण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक स्थिती फारशी मजबूत राहणार नाही, महागाई किंवा आर्थिक मंदीचे सावट राहू शकते. पाऊस आणि महापुराचा धोका शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हवामान अंदाजाबाबत भेंडवळच्या भाकितात म्हटले आहे की, पावसाची सुरुवात जोमदार असेल, जूनमध्ये भरपूर पाऊस होईल. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहून ओढ देण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट ओढवेल, ज्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. पिकांची स्थिती: कापूस-तांदूळ जोमात, पण रोगराईची भीती यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन भरपूर येईल. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील. काय आहे ही ‘भेंडवळची घटमांडणी’? अमरावती-बुलढाणा सीमेवर असलेल्या भेंडवळ येथे महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ३५०-३७० वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती. आजही त्यांचे वंशज ही परंपरा पुढे चालवत आहेत. शेतात मध्यभागी खड्डा खोदून त्यात मातीचा घट मांडला जातो. त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि विविध खाद्यपदार्थ (पापड, वडा, भजा) ठेवले जातात. घटाच्या भोवती १८ प्रकारची धान्ये मांडली जातात. सकाळी या घटात आणि धान्यात होणाऱ्या बदलांवरून वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते. भेंडवळच्या घटमांडणीला शास्त्रीय आधार? विज्ञानाच्या युगात या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगितले जाते. मात्र, तरीही गेल्या साडेतीनशे वर्षांपासून शेतकऱ्यांचा यावर गाढा विश्वास आहे. निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास आणि परंपरेतून येणारे हे ठोकताळे बऱ्याचदा खरे ठरत असल्याने आजही हजारो शेतकरी या अंदाजावर आपले वार्षिक नियोजन करत असतात.
