नळाला मोटार लावतानाउंडणगावात मुलाचा मृत्यू:गावात सण साजरा नाही
![]()
प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तो सकाळी घरासमोर नळाला पाण्याची मोटर लावत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुटुंबाला मदत म्हणून मोटर सुरू करत होता. त्याचवेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातील आजी, वडिलांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही जोरदार धक्का बसला. ते दूर फेकले गेले. आरडाओरड झाली. शेजारी धावत आले. वीज बंद केली. कुटुंबीय, शेजाऱ्यांनी गणेशला तातडीने गावातील दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सिल्लोडला नेण्याचा सल्ला दिला. त्याला उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड येथे नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दवाखान्यात वडिलांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. “डॉक्टर साहेब, मला एकच मुलगा आहे, त्याला वाचवा हो,” अशी विनंती त्यांनी केली. गणेशवरवर दुपारी दोन उंडणगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. गणेश अभ्यासात हुशार, नम्र होता. सर्वांचा लाडका विद्यार्थी होता. त्याच्या जाण्याने शाळा, मित्रपरिवार, गावात हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय तृतीया आनंदाचा सण असतो. या घटनेमुळे नागरिकांनी सण साजरा केला नाही. अनेकांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. घरात होता एकुलता एक गणेशची आई रोजनदारीने शेतात काम करते. वडील हमाली करतात. एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
