चालक-वाहकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 25 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना

0
db-temp-cover-marathi-2026-04-19t091455973_1776570267.jpg




सोशल मीडियावरील ‘रील’ बनवण्याचे वेड किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयावह अनुभव समृद्धी महामार्गावर आला आहे. चालक आणि वाहक रील बनवण्याच्या नादात असताना, मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सदर खाजगी बस (मुंबई ते पुसद) शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ आली होती. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, बसचा चालक आणि वाहक दोघेही मोबाईलवर ‘रील’ बनवण्यात दंग होते. याच नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस एका कारवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील २५ प्रवासी जखमी झाले, तर कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दीड वर्षांच्या चिमुकल्याचा अंत या अपघातातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, एका दीड वर्षांच्या लहान मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाचा निष्काळजीपणा; डॉक्टर गायब! अपघातानंतर जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर प्रशासनाचा आणखी एक गलथान कारभार समोर आला. गंभीर जखमी रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात असतानाही रुग्णालयात तब्बल एक तास एकही डॉक्टर हजर नव्हता. वेळेवर उपचार मिळत नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच मोठा आक्रोश केला. डॉक्टरांच्या या अनुपस्थितीमुळे जखमींच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर दरम्यान, समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला झाल्यापासून त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजच्या अपघातात चालक आणि वाहकाची चुकी असली तरी, इतर अपघातासाठी मात्र विविध कारणे कारणीभूत आहेत. 17 दिवसांपूर्वीच भरधाव कंटेरनने महिला मजुरांच्या पिकअपला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघात झाला होता. या घटनेत ८ महिला मजूर ठार झाल्या तर ३ जखमी झाले होते. या मजूर महिला समृद्धीवर साफसफाईचे काम आटोपून घरी परतत होत्या. वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks