[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, बेकायदेशीर जुगार तसेच घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये एकूण ८ लाख ५२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कळ्ळाळ येथील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना रेती उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत पाच तराफे आणि साठवून ठेवलेली सुमारे २० ब्रास वाळू असा अंदाजे ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट केला. याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच पर्यावरण व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जवाहरनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा : २९ ऑगस्ट रोजी जवाहरनगर येथील मोकळ्या जागेत काही व्यक्ती तिर्रट नावाचा पैशांवर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पंचांसह छापा टाकून बालाजी गंगाधर कदम, वैभव आनंदा कांबळे, कामाजी शंकर कदम आणि रावसाहेब प्रकाश आकले यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून ४ हजार २०० रुपये रोख, पाच मोबाईल, दोन मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा ४ लाख ९७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कैलास गुंजारे, बालाजी पापलवाड व दत्ता गायकवाड हे पोलिसांना पाहून पसार झाल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंजर बाळगणाऱ्यास अटक : गोविंद कॉलनी-सिडको रोडवर घातक खंजर घेऊन एक इसम फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मनीप्रतिसिंग ऊर्फ तेजुचरणसिंग टाक (वय २३) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत धारदार लोखंडी खंजर आढळून आला. सुमारे ५०० रुपये किमतीचा खंजर जप्त करून शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव व इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांनी केली. अवैध रेती उत्खनन, वाहतूक, जुगार-मटका आणि बेकायदेशीर शस्त्रांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 490
[ads2]
















Leave a Reply