अमरावती पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:47 प्रतिसाद किटचे वाटप, तात्काळ मदतीसाठी सज्ज
![]()
अमरावती जिल्ह्यात आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा उद्देश जीवित व वित्तहानी टाळणे हा आहे. या प्रशिक्षणात शहर आणि ग्रामीण दोन्ही पोलीस दलातील शिपाई सहभागी झाले होते. यावेळी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ४७ ‘आपत्ती प्रतिसाद किट’चे वाटप करण्यात आले. जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी होणारी हानी टाळण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी या शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. पोलीस कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात आपत्ती व्यवस्थापन किट हाताळणे, मोठे व मध्यम आकाराचे स्ट्रेचर, लाईफ जॅकेट, हॅडग्लोज, गमबूट, सेप्टी नेट, ३० मीटर रॅपलिंग रोप आणि किट स्टोरेज बॉक्सचा वापर करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच वैद्यकीय प्रथमोपचार (सीपीआर), आपत्तीमध्ये जखमींना उचलण्याच्या पद्धती आणि प्राथमिक उपचार यावरही भर देण्यात आला. पूर, आग, वीज कोसळणे, भूकंप आणि उष्माघातासारख्या विविध आपत्तींचा सामना कसा करावा, तसेच अशा परिस्थितीत घ्यावयाची काळजी व कार्यवाही याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी व्यक्त केला. या प्रशिक्षणात क्रिएटिव्ह न्यू टेक लिमिटेडचे प्रा. डॉ. विलास बैले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग पचौरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन भारसाकडे, विनय कढाणे आणि संतोष कविठकर यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. सुरेंद्र रामेकर यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य आणि सुमीत बांबल यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
