बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकली ठार:विर्शी येथील घटना, साकोली तालुक्यात मानव – वन्यजीव संघर्ष शिगेला
![]()
साकोली तालुक्यात मानव- वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे. याआधी एका नरभक्षक वाघिणीने दोघांचा जीव घेतला. तर अन्य एका हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. या घटनांची शाई वाळत नाही तोच बुधवार १५ एप्रिल रोजी पहाटे ५ च्या सुमारास विर्शी परिसरात मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका पाच वर्षीय चिमुकलीच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५ वर्षे) असे मृतक दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगढ राज्यातील बलोदा (बाजार) जिल्ह्याच्या सुहेला या गावची रहिवासी आहे. या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांत दहशत पसरली असून, त्यांच्या मनात वन विभागाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. परिणामी, वनविभाग आता अधिकच अडचणीत सापडलेला आहे. आधीच तालुक्यात नरभक्षक वाघिणीची दहशत विर्शी गावालगतच्या शेतशिवारात बुधवारी पहाटे वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात चिमुकली जागीच गतप्राण झाली. नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आशिका काशिनाथ मिरी या दुर्दैवी बालिकेचे मृत्यूने संपूर्ण परिसरात संताप आणि तणावाचे वातावरण पसरलेले आहे. काशिनाथ मिरी हे आपल्या कुटुंबासह विर्शी येथील संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीवर कामासाठी आले आहेत. रोजच्या प्रमाणे कुटुंब झोपलेले असताना पहाटे ५ वाजता दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. काही कळण्याच्या आतच पाच वर्षाच्या चिमुकलीला जबड्यात पकडून ओढून नेले आणि क्षणात ठार केले. नरभक्षक वाघिणीच्या शोधासाठी १७० कर्मचाऱ्यांची फौज रणरणत्या उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. त्यातच नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यात सध्या वेगळाच थरार अनुभवायला मिळत आहे. टी-२७ या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे १७० हून अधिक कर्मचारी जीवाची बाजी लावून तैनात आहेत. त्यातच विर्शी येथे बिबट्याने हल्ला केल्याची चौथी घटना घडली. त्यामुळे नरभक्षी वाघिणी सोबत या बिबट्याला जेरबंद करण्याचे दुहेरी आव्हान वनविभागासमोर आहे. गेल्या २६ दिवसांपासून ही चतुर वाघीण वनविभागाच्या हातावर तुरी देऊन जंगलाच्या कानाकोपऱ्यात हुलकावणी देत आहे. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असतानाही वनविभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या हिंस्र श्वापदाचा मार्ग शोधत आहे हे विशेष. १९ मार्च २०२६ रोजी बांपेवाडा येथील वसंता मेश्राम यांच्यावरील जीवघेण्या पहिल्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले. त्यानंतर २८ मार्च रोजी उमरझरी येथील माया सोनवणे यांच्यावर शेतात मिरची तोडत असताना वाघिणीने हल्ला केला. नागपुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर १ एप्रिल रोजी आमगाव येथील छाया मूंगमोडे यांना गंभीर जखमी करत या वाघिणीने नरभक्षक रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले. १५ एप्रिलला बिबट्याने एक निरागस मुलीचा जीव घेतला. मागील अनेक दिवसांपासून वाघीण वनविभागाच्या हाती लागली नाही. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, वन विकास महामंडळ, प्रादेशिक विभाग आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस जंगलाचा कानाकोपरा पालथा घालत आहेत. पण अद्याप ती हाती लागली नाही. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्या नागझिरा – नवेगावबांध वन्यजीव अभयारण्य व साकोली, लाखनी वनपरिक्षेत्रात तणावपूर्ण शांतता आहे. २६ दिवसांपासून सुरू असलेला हा वन्यप्राणी आणि मानव संघर्ष कधी संपतो? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. उमरझरीच्या घटनेनंतर त्या परिसरात मोठे फलक लावून जनजागृतीचा वेग वाढविण्यात आला आहे. वाघिणीला जेरबंद करेपर्यंत ही मोहीम थांबणार नाही असा निर्णय वनविभागाने घेतलेला आहे. वाघिणीला एका जागी स्थिर करण्यासाठी आणि तिची भूक शमविण्यासाठी वन विभागाने जंगलात ८ विविध ठिकाणी ‘बेट’ (‘रेडको आणि बकरे ) बांधलेले आहेत. तांत्रिक गणितानुसार वाघीण भक्ष्य खाण्यासाठी तिथे येईल आणि त्यानंतर तिला डार्ट मारून बेशुद्ध करणे सोपे जाईल अशी योजना होती. मात्र ही वाघीण अत्यंत बुद्धिमान असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाघिणीसाठी ठेवलेले दोन भक्ष्य चक्क बिबट्यांनी फस्त केल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेले आहे. यामुळे वनविभागाच्या रणनितीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जंगलात वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९० अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. उमरझरी,बामपेवाडा, शिवनटोला आणि निपरटोला या गावालगतच्या भागात ही वाघीण सातत्याने आपले स्थान बदलत असल्याचे दिसून आलेली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) ३०-३० जणांच्या ३ तुकड्या डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. सोबत आरआरटीचे ३० जवान २४ तास सज्ज आहेत. नागझिरा – नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांनी याविषयी बोलताना सांगितले, वाघ हा निसर्गातील सर्वात बुद्धिमान शिकारी आहे.केवळ विपरीत परिस्थितीच तो मानवावर हल्ला करतो.संबंधित वाघिणीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाची संपूर्ण यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत आहे.ही मोहीम अत्यंत संवेदनशील असल्याने नागरिकांनी संयम राखावा आणि वनविभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
