संभाजीनगरमध्ये हायकोर्ट वकिलाचा मृतदेह आढळला:अज्ञाताने खून केल्याचा संशय, बीड बायपास राेड गांधेली फाट्याजवळील घटना
![]()
शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याच्या जवळ हायकोर्टातील एका वकिलाचा मृतदेह आढळून आला आहे. मिथुन भास्कर (४९, रा. आनंदनगर, बीड बायपास) असे मृत वकिलाचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील सपोनि भारत पाचोळे, जगन्नाथ मेनकुदळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी मांडीजवळ रक्तस्राव झालेला दिसला. पोलिसांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरा एसीपी भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनीदेखील घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेहापासून झुडपापर्यंत रक्ताचे डाग, गाडीही तशीच मृतदेह रस्त्याच्या कडेला होता. तिथेच त्यांची मोपेड (एम एच २० जीएन १६०८) उभी होती. १५० मीटर अंतरावर झुडपात त्यांचे रक्त दिसले. या संपूर्ण मार्गावरदेखील त्यांचे रक्त आहे. त्यामुळे हल्ला झाल्यानंतर बचावासाठी ते मुख्य रस्त्याकडे धावले आणि तिथेच पडून राहिले, असा अंदाज आहे. गाडीवर २ वेगवेगळ्या व्यक्तींचे ठसे मिळून आले आहेत. त्यांच्या दुचाकीला चावीदेखील तशीच होती, डिकीमध्ये कागदपत्रे होती.
