मोठी बातमी:शिवसेनेत मोठा बदल, आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपदाची संधी; 2003 साली बाळासाहेबांनी निर्माण केलेले पद पुन्हा चर्चेत
![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षात युवा नेते आदित्य ठाकरे यांना लवकरच महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती होण्याची शक्यता असून, यासंदर्भात पक्षात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, हे कार्याध्यक्ष पद शिवसेनेत प्रथम 2003 साली बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी निर्माण केले होते. त्या पदावरून उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या आगामी बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन जवळ येत असताना या निर्णयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच दिवशी आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, त्यानंतर उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करू शकतात. सध्या आदित्य ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नेते आणि युवासेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मात्र, कार्याध्यक्ष पद मिळाल्यास पक्षाच्या धोरणात्मक आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा अधिक थेट सहभाग वाढेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे समजते. विशेषतः तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि संघटना सक्रिय करण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे. गेल्या काही काळात आदित्य ठाकरे यांनी मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर दौरे केले आहेत. जनसंवाद यात्रा आणि विविध सभांमधून त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षात नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडूनही त्यांना पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. पक्षासाठी ऐतिहासिक टप्पा ठरेल जर आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. यामुळे पक्षाच्या नेतृत्वात नव्या पिढीला संधी मिळेल आणि आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक सज्ज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या सर्व चर्चांवर अंतिम निर्णय काय होतो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
