Pune Construction | पुण्यात RMC उद्योगाचा मोठा निर्णय! 15 एप्रिलपासून उत्पादन आणि पुरवठा बंद
Pune Construction | पुणे (Pune) शहराच्या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (Ready Mix Concrete) म्हणजेच आरएमसी (RMC) उद्योगाने १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून आपले कामकाज तात्पुरते बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. पुणे आरएमसी असोसिएशनने (Pune RMC Association) एकमताने हा निर्णय घेतला असून, शासनाकडून स्पष्ट नियमावलीची मागणी यामागे असल्याचे सांगण्यात आले आहे.
विस्कळीत नियमावली आणि ‘सिंगल विंडो’ प्रणालीची मागणी
आरएमसी उद्योगासाठी सध्या अस्तित्वात असलेले नियम अत्यंत विखुरलेले असून, त्यामध्ये सुसूत्रता नसल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप अलेकर (Pradeep Alekar) यांनी स्पष्ट केले की, गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सरकारकडे ‘सिंगल विंडो’ (Single Window) प्रणालीद्वारे एकसंध नियमावलीची मागणी करत आहोत. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आणि उद्योगासमोर वाढत्या अडचणींमुळे आत्मपरीक्षणासाठी हा तात्पुरता बंद पाळला जाणार आहे.
५,००० कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग दरवर्षी शासनाला सुमारे १,००० कोटी रुपयांचा कर भरतो. असे असतानाही केवळ या उद्योगालाच लक्ष्य केले जात असल्याची भावना अलेकर यांनी व्यक्त केली. उद्योगातील उणिवा दूर करण्याची तयारी व्यावसायिकांनी दर्शवली असली, तरी त्यासाठी शासनाने कामाची एक स्पष्ट चौकट आणि नियम आखून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाहतूक कोंडी आणि धुळीच्या तक्रारींवर स्पष्टीकरण
शहरातील धुळीचे प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघातांसाठी अनेकदा आरएमसी वाहनांना जबाबदार धरले जाते. यावर भूमिका मांडताना अलेकर म्हणाले की, काँक्रीटमुळे थेट धूळ निर्माण होत नाही, परंतु अवजड वाहनांच्या हालचालीमुळे रस्त्यावरील धूळ उडते, ज्याचा नाहक ठपका या उद्योगावर येतो. या समस्यांवर तोडगा म्हणून आरएमसी वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने विशिष्ट वेळेचे स्लॉट (Time Slots) निश्चित करून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सध्या ‘पीक अवर’ (Peak Hour) मध्ये वाहतुकीसाठी मर्यादित वेळ मिळत असल्याने उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. येत्या दहा दिवसांच्या काळात हा उद्योग आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आत्मपरीक्षण करणार आहे. या अचानक जाहीर झालेल्या बंदमुळे पुण्यातील बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून, आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News Title: Pune Construction RMC Association Stops Supply from Midnight
