पाहुणे इकडे कुठे, विचारताच "एसीबी'ने लाचखोर कॉन्स्टेबलला घेतले ताब्यात:पत्नीच्या छळ केल्या प्रकरणातील गुन्ह्यात मदतीसाठी घेतली 35 हजार रुपयांची लाच
![]()
येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३५ हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अनिल अजिनाथ गोसावी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. लाच घेतल्यानंतर गोसावी याने एसीबीच्या पथकातील कर्मचाऱ्यालाच इकडे कुठे? असे विचारले अन् पथकाने त्याला अलगद ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी असलेल्या तक्रदरास गुन्ह्यात मदत करण्यासाठी कर्मचारी गोसावी याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. यात गोसावी याने तडजोडीअंती ३५ हजारांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. बुधवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा कारवाईदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गोसावी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गोसावीने सात वर्षांपूर्वीही घेतली ५ हजारांची लाच पोलिस कर्मचारी अनिल गोसावी (त्यावेळचे आडनाव गिरीगोसावी) कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असताना २७ डिसेंबर २०१९ रोजी त्याला ५ हजारांची लाच घेताना अहिल्यानगरच्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर कोर्टात दाखल करण्यासाठी त्या प्रकरणातील फिर्यादीकडून त्याने लाच स्वीकारली होती. या गुन्ह्यात गोसावी याच्या विरोधात २१ नोव्हेंबर २०२० रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
