धनंजय मुंडे हे दुसरे अशोक खरात:करुणा मुंडेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – त्यांनीही खरात सारखेच महिलांवर अत्याचार केले
![]()
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवली असतानाच, करुणा मुंडे यांनी या वादात उडी घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत घणाघाती टीका केली आहे. “महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले असून ते दुसरे ‘खरात’च आहेत,” असा खळबळजनक आरोप करत करुणा मुंडे यांनी खरात प्रकरणाच्या निमित्ताने मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक खरातने राजकीय आणि प्रशासकीय पाठबळावर मोठे सिंडिकेट उभारून महिलांचे शोषण केल्याचे समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या ‘कॉल कुंडली’द्वारे अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असतानाच, करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आणि विखारी शब्दांत टीका केली आहे. ‘खरात’ प्रकरणाचा ‘आका’ कोण? करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे हे दुसरे खरातच आहेत. खरातने महिलांवर जितके अत्याचार केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले. चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले. अशोक खरातचे फोटो सर्व मोठ्या नेत्यांसोबत आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार किंवा ‘आका’ कोण आहे, हे समोर आलेच पाहिजे.” “रुपाली चाकणकर यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे? त्यांच्या खात्यांचे व्यवहार आणि फोन कॉल्सची सखोल चौकशी व्हायला हवी. ही चौकशी न झाल्यास मी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन,” असा इशारा करुणा मुंडेंनी दिला. महिला आयोगावर ‘निवृत्त न्यायाधीश’ हवा! राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना करुणा मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “हे पद पुन्हा राष्ट्रवादीकडे गेले, तर महिलांना कधीच न्याय मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला. ‘देवाभाऊंनी’ यामध्ये राजकारण न करता महिला आयोगाचे अध्यक्षपद एखाद्या निवृत्त न्यायाधीशाला द्यावे,” अशी मागणी देखील करुणा मुंडे यांनी केली. आयजी कराळे आणि ‘एपिस्टन’चा संदर्भ अशोक खरात प्रकरणात पोलीस प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही करुणा मुंडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आयजी कराळे यांचे खरातशी काय संबंध होते? त्यांनी खरातला साथ का दिली? याची चौकशी होणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या. इतकेच नव्हे तर, या प्रकरणात अनेक ‘मोठे मासे’ अडकण्याची शक्यता असल्याने खरातच्या जीवाला धोका असल्याचेही करुणा मुंडेंनी नमूद केले. “अमेरिकेतील कुख्यात एपिस्टनप्रमाणे खरातचाही तुरुंगात खून होऊ शकतो, त्यामुळे त्याच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे,” असा दावा त्यांनी केला.
