दिल्लीजवळील बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्थानकावरून महिलांना ऊत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप

0
WhatsApp-Image-2026-04-14-at-10.36.13.jpeg


नोएडा दिल्ली ( एनसीआर) – दिल्लीजवळील नोएडा परिसरातील बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्थानकावर 11 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन महिलांसह एका पुरुषाला जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक, कामगार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकृती, सृष्टी आणि मनीषा या तीन महिला तसेच रुपेश नावाचा एक पुरुष हे कामगार हक्कांसाठी कार्य करणारे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही पोलीस गणवेशात तर काही साध्या कपड्यांमध्ये होते. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेताना पोलिसांनी आपली ओळख स्पष्ट केली नाही किंवा त्यांना कुठे आणि का नेले जात आहे याची माहिती दिली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेदरम्यान स्थानक परिसरात शेकडो लोक उपस्थित होते. अनेकांनी मोबाईलवर या प्रकाराचे व्हिडिओही चित्रीत केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे महिलांना ताब्यात घेताना एकही महिला पोलीस उपस्थित नव्हती, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

रात्री उशिरापर्यंत संबंधित महिला आणि पुरुष घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र रात्री सुमारे 3 वाजेपर्यंत पोलिसांकडून “याबाबत कोणतीही माहिती नाही” असे उत्तर दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, कायद्यानुसार सूर्योदयापूर्वी महिलांना अटक किंवा ताब्यात घेण्याबाबत विशेष नियम आहेत. या घटनेत त्या नियमांचे पालन झाले का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

ही घटना त्या काळात घडली जेव्हा दिल्ली-एनसीआर परिसरात कामगारांच्या वेतनवाढ, कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाविरोधात विविध आंदोलने सुरू होती. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना गॅस सिलेंडर व इतर खर्च परवडत नसल्यामुळे अनेक कामगार मूळ गावी परत जाऊ लागल्याचीही चर्चा होती. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर दबाव निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर नोएडा प्रशासन, पोलीस अधिकारी आणि औद्योगिक प्राधिकरण यांची बैठक होऊन कामगारांचे स्थलांतर कसे रोखावे यावर चर्चा झाल्याचा दावा काही कामगार संघटनांनी केला आहे. 11 एप्रिल रोजी सभा संपल्यानंतर घरी परतणाऱ्या या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

घटनेनंतर संबंधित व्यक्तींचा ठावठिकाणा स्पष्ट न झाल्याने दोन वकील न्यायालयात माहिती घेण्यासाठी जात असताना त्यांनाही काही काळ ताब्यात घेतल्याचा आरोप समोर आला आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.नोएडा पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नागरिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

आज 14 एप्रिलपर्यंत संबंधित महिला आणि पुरुषांविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लोकशाही, नागरिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांनी संविधानातील कलम 19 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी एकत्र उभे राहण्याचे आवाहन आर्टिकल 19  चे नवीनकुमार यांनी केले आहे.



वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks