शक्तीपीठ महामार्गाच्या परिसरात अशोक खरातची जागा:व्यवहाराची किंमत 2 कोटींच्या घरात; सोलापुरात 11 एकरांहून अधिक जमीन
![]()
भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात याने पुणे, शिर्डी आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांनंतर आता सोलापुरातही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे तपासातून समोर आले आहे. अशोक खरातने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजेच सुमारे 11 एकरांहून अधिक जमीन स्वतःच्या नावावर खरेदी केली असून, या नवीन खुलाशामुळे त्याच्या बेनामी संपत्तीचे धागेदोरे आता सोलापूरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 28 मार्च 2024 रोजी नोंदणी झालेल्या या व्यवहाराची किंमत 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये असून, यामध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने, जिथे जमिनीचे बाजारभाव साधारण 5 ते 6 लाख रुपये प्रति एकर आहेत, तिथे खरातने तब्बल 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर या चढ्या दराने ही जमीन खरेदी केल्याचे खरेदीखतातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या संदर्भात अधिकची माहिती अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हद्दीत पत्नीच्या नावे जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियोजित शक्तीपीठ महामार्ग कळमण हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने अशोक खरातने ही जमीन खरेदी केली असल्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या अटकेनंतर आता त्याची पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने कंबर कसली आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना नाशिकमधील आपल्या राहत्या घरातून फरार झाली असून, 10 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही. कल्पना खरातचा माग काढण्यासाठी तपास यंत्रणेने आता तिचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि घरगुती नोकरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. एसआयटीच्या पथकाने नाशिकमधील तिच्या काही जवळच्या मैत्रिणींसह आत्ताच्या व जुन्या नोकरांचीही चौकशी सुरू केली असून, ती नेमकी कोणाच्या संपर्कात आहे आणि तिने कुठे आश्रय घेतला असावा, या दिशेने पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.
