नाशिकमध्ये परिचारिकेची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या:दोन वाजता ड्युटी संपवून गेली अन् पुन्हा दरवाजा उघडलाच नाही
![]()
येथील एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिकांसाठी असलेल्या रुममध्ये शनिवारी (दि. 11) दुपारी 22 वर्षीय नर्सने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. नाशिकरोड पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकरोडच्या रुग्णालयात तन्वी भदाणे (22, गुंजाळनगर, ता. देवळा) ही दीड वर्षांपासून परिचारिका म्हणून कार्यरत होती. रुग्णालयाच्या वरच्याच मजल्यात वसतिगृहमध्ये ती रहात होती. शुक्रवारी 8 ते 2 या वेळेतील ड्युटी संपवून ती रूममध्ये गेली. शनिवारी दुपारी तिची सहकारी ड्युटीला गेली. तोपर्यंत तन्वी ही रुममध्ये व्यवस्थित होती. ड्युटीला गेलेली नर्स काम आटोपून रुमवर आली. मात्र, तन्वी दरवाजाच उघडेना. फोनलाही प्रतिसाद देईना. दरवाजाच्या फटीतून बघितले, तर ती उभी दिसत होती. त्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापनाला सांगितल्यावर दरवाजा उघडण्यात आला. यावेळी तन्वीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर दिसत होते. सहकाऱ्यांनी तातडीने तिला खाली उतरवले, मात्र तिचा मृत्यू झाला होता. तिने असे का केले? ती शुक्रवारीच घरी आली होती. तिला टेन्शन नव्हते. उलट ती घरच्यांना सर्वांना जीव लावत होती. पण अचानक असे का केले, काहीच समजत नाही. – नाना भदाणे, तन्वीचे वडील शुक्रवारीच घरुन आली, शनिवारी टोकाचे पाऊल तन्वी ही मूळची देवळा तालुक्यातील गुंजाळनगर येथील असून, तिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. दीड वर्षांपासून नाशिकमध्ये नोकरी करून ती कुटुंबाला हातभार लावत होती. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न तिच्या कुटुंबियांनाही पडला आहे. विशेष म्हणजे, ती शुक्रवारीच घरी जाऊन आली होती.
