गोंदियात कठडा नसलेल्या विहिरीत पडून वाघाचा मृत्यू:शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात आल्याची शक्यता, तपास सुरू

0
ba4161f7-17e7-48fb-bfbd-49a9c11fbe35_1775997823176.jpg




गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी १० वाजता उघडकीस आली. मृत वाघ सुमारे ४ ते ५ वर्षांचा होता. ग्रामस्थांना विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना दिसताच त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा वाघ शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात फिरत असताना तोल जाऊन विहिरीत पडला असावा. ही घटना सुमारे चार दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर वाघाला विहिरीतून बाहेर काढले. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की त्यामागे शिकारीचा कोणताही संशय आहे, याचा तपास सुरू आहे. यासाठी वनविभागाने ‘व्हिसेरा सॅम्पल’ प्रयोगशाळेत पाठवले असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. वाघांचे वाढते मृत्यू हा एक गंभीर विषय बनला आहे. राष्ट्रीय स्तरावरील आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात देशात १६९ वाघांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातही वाघांच्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. वनतोड, अधिवास कमी होणे, मानवी हस्तक्षेप, आजारपण आणि अवैध शिकार यामुळे वाघांवर संकट वाढत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील सुमारे एक तृतीयांश वाघांचे मृत्यू हे संरक्षित क्षेत्राबाहेर होत असल्याचेही समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed